भालकेंना पंढरपूर तालुक्यातच धक्का; आवताडेंना ९०० मतांची आघाडी; आता मंगळवेढ्याकडे लक्ष

आवताडे यांना लीड देण्यात परिचारक यांना यश आले आहे

पंढरपूर : अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या मतमोजणीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या सतराव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी ९०१ मतांची आघाडी घेतली आहे. ह्या सतरा फेऱ्यांची मतमोजणी ही पंढरपूर तालुक्यात झाली असून आता मंगळवेढ्याची मतमोजणी सुरू होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भारत भालके यांना पंढरपूर तालुक्यात निर्णायक सुमारे ६००० मतांची आघाडी मिळाली होती. ती भारत भालके यांना विजयासाठी महत्वाची ठरली होती. यंदाच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचे आवताडे यांनी हे मताधिक्य कमी करून ९०० मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पुढील मतमोजणीकडे म्हणजेच मंगळवेढ्यातील फेऱ्यांकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 

पंढरपूर तालक्यातून मिळालेली आघाडी पाहता भाजपचे उमेदवार प्रशांत परिचारक ह्यांनी आवताडे यांच्यासाठी जोरदारपणे ताकद लावल्याचे दिसून येत आहे. कारण, त्यांच्या भूमिकेविषयी काही जणांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, निर्णायक मताधिक्क देत त्यांनी सर्वांना चोख उत्तर दिले आहे. कारण, गेल्या वेळी भारतनानांना पंढरपूर तालुक्यातून सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती. ती कमी करून आवताडे यांना लीड देण्यात परिचारक यांना यश आले आहे.

भगिरथ भालके यांना पंढरपूर तालुक्यात कमी मते मिळण्यामागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवारही कारणीभूत असू शकतो. कारण त्यांच्यासाठी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. तसेच, विठ्ठल साखर कारखान्यच्या काही संचालकांनीही भालके यांची साथ सोडत स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावली होती. त्याचा फटका भगिरथ भालके यांना बसू शकलेला असू शकतो. त्यासाठी गावनिहाय मतांचे विश्लेषण करावे लागेल.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी भालके यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. विशेषतः अजित पवार यांनी पंढरपुरात दोन दिवस मुक्काम ठोकत परिचारक गटाला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, सर्वांच्या गाठीभेटी घेऊन त्याचा तेवढासा फायदा भगिरथ यांना झालेला दिसत नाही.

दरम्यान, मताधिक्य पाहता ही कांटे की टक्कर सुरू आहे. कारण फेरीनिहाय मताधिक्कय कमी जास्त होत आहे. मागच्या निवडणुकीतही भारत भालके यांना मंगळवेढ्यातही आघाडी मिळाली होती. आता मंगळवेढ्याच्या मतदारांनी भालके यांना पसंती दिली आहे की तालुक्याचे भूमिपूत्र असलेले समाधान आवताडे यांना संधी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

Leave A Reply

Translate »