महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १ मे पर्यंत संचाबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत. तरी देखील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसते आहे. दररोज करोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. यामुळे राज्याची चिंता वाढली असून मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील, असे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत कडक लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, तेथे कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात काल 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले आहे.

Leave A Reply

Translate »