पुण्याच्या महापौरपदासाठी अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत; अनुभव, चाणक्य नीती आणि जनसेवेची भक्कम पार्श्वभूमी
पुणे : पुणे महानगरपालिकेत ११९ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पार्टीकडून महापौरपदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. अनुभवी नेत्याला संधी दिली जाणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘धक्कातंत्र’ वापरत नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच पुण्याच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यंदाचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित, अनुभवी आणि जनतेशी थेट नाते असलेल्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे नाव महापौरपदासाठी अग्रक्रमाने चर्चेत आले आहे.
पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महानगरपालिका असल्याने, मुंबईनंतर पुण्याचा महापौर कोण होणार याला विशेष राजकीय महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर अर्चना पाटील यांची कामगिरी आणि अनुभव लक्षवेधी ठरत आहे. एमबीए फायनान्ससारखे उच्च शिक्षण घेतलेल्या अर्चना पाटील यांनी २०१७ साली भवानी पेठेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचा पराभव केला होता. चाणक्य नीती, अचूक रणनीती आणि लोकसंपर्काच्या बळावर मिळवलेला हा विजय भाजपसाठी ऐतिहासिक ठरला होता.
२०२६ च्या निवडणुकीतही त्यांनी सुनियोजित कामकाज, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासकामांची ठोस पोचपावती मिळवत दणदणीत विजयाची पुनरावृत्ती केली.
प्रभाग क्रमांक २२ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र अर्चना पाटील यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक आणि विकासकामांच्या जोरावर हा बालेकिल्ला भेदत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले. सलग दुसऱ्यांदा निवडून येत त्यांनी आपली लोकप्रियता आणि नेतृत्वगुण ठामपणे सिद्ध केले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे भवानी पेठेतील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला असून, त्या परिसरातून भाजपचे दोन नवखे उमेदवार मृणाल कांबळे आणि विवेक यादव विजयी करण्यातही अर्चना पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
नगरसेविका म्हणून अर्चना पाटील यांनी झोपडपट्टी भागात विशेष लक्ष केंद्रित करत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रभावी काम केले आहे. कॅन्टोन्मेंट क्षेत्रात सत्ता असूनही कोणतेही लाभाचे पद न मिळाल्याची तक्रार न करता त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
अर्चना तुषार पाटील यांनी केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण पुणे शहरात आपली संघटनात्मक क्षमता सिद्ध केली आहे. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा म्हणून त्यांनी पक्षबांधणी, महिला संघटन आणि जनसंपर्क या माध्यमातून प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य म्हणून काम करताना त्यांना प्रशासकीय कार्यपद्धती, आर्थिक नियोजन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळाला आहे.
भविष्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक किंवा विलीनीकरण झाल्यास, अर्चना पाटील महापौर झाल्या तर पुण्याला सक्षम, दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या अर्चना पाटील यांना महापौरपदाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत असून, याचा भाजपलाही राजकीयदृष्ट्या निश्चितच लाभ होईल, असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.

Comments are closed.