पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त महानगर गॅस लिमिटेडच्या ‘एमजीएल आरोग्य कार्यक्रम’ या सीएसआर उपक्रमांतर्गत गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाच्या निदानासाठी मोफत एचपीव्ही डीएनए तपासणी शिबिर दापोली येथे पार पडले. महानगर गॅस लिमिटेड, सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे, तहसील कार्यालय दापोली आणि आयुजेन बायोसायन्सेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन दापोलीच्या तहसीलदार तथा दंडाधिकारी श्रीमती अर्चना बोंबे यांनी केले होते. या वेळी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क, पुणेचे सहायक व्यवस्थापक वैभव निमगिरे तसेच आयुजेन बायोसायन्सेसचे मनीष पुंगलिया प्रमुख उपस्थित होते. शिबिरात आशा स्वयंसेविका तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अर्चना बोंबे यांनी केले. यावेळी वैभव निमगिरे यांनी माहिती देताना सांगितले की, महानगर गॅस लिमिटेड आणि सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या सहकार्याने महिलांच्या आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ग्रामीण महिलांसाठी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाबाबत जागरूकता आणि मोफत तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. एमजीएल आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित समुदायांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या शिबिरात ३० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांची एचपीव्ही डीएनए तपासणी करण्यात आली. ही चाचणी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचा धोका ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. साधारणपणे या चाचणीसाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च येतो. मात्र या शिबिरात ही तपासणी महिलांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी मनीष पुंगलिया यांनी सांगितले की, भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. विशेषतः ३५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. ग्रामीण भागात हा आजार प्रतिबंध करता येण्याजोगा असतानाही त्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. दरवर्षी भारतात या कर्करोगाचे सुमारे १ लाख ३० हजार नवीन रुग्ण आढळतात, तर सुमारे ७४ हजार महिलांचा मृत्यू होतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसत नसल्यामुळे स्क्रीनिंग कार्यक्रमांद्वारे लवकर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगर गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल आणि सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क, पुणेचे महासंचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Comments are closed.