अपक्ष उमेदवार सचिन सानप कसे? आले निवडणुकीच्या मुख्य रिंगणात
पुणे: शेतकरी कुटुंबातील एक साधा प्राध्यापक, “शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा” ही टॅगलाईन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला. शिक्षक- प्राध्यापक संघटनांनी आग्रह धरला आणि प्रा. सचिन सानप यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली. वाडिया महाविद्यालयात भव्य सभा झाली आणि हजारो शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढून सचिन सानप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यानच्या काळात शिवसेनेकडून आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी देखील अर्ज भरला. त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडल्याची चर्चा रंगली. पण मोठी राजकीय घडामोड घडली आणि पक्षाच्या आदेशानुसार मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षासह इतर उमेदवारांना निवडणूक सोपी झाली,अशी चर्चा रंगली. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आणि एक मोठा ट्विस्ट आला. शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात प्रा.सचिन सानप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे वक्तव्य करण्यास सुरुवात केली. मंत्री उदय सामंत यांनी सचिन सानप हे ओएसडी असले म्हणून काय झाले ते एक प्राध्यापक आहेत आणि निवडणूक लढत आहेत त्यांना डीवचण्यात आले म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशा प्रकारची वक्तव्य माध्यमांमध्ये केली. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी सचिन सानप हा मुलाचा शिवसैनिकच आहे, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. सचिन सानप हा पुणे शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढणार आहे, आम्ही राज्यात महायुती म्हणून लढत असलो तरी पुण्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे,असे शिंदे यांनी जाहीर केले. त्यामुळे सानप हे अपक्ष असूनही निवडणुकीच्या रिंगणातील केंद्रबिंदू असे उमेदवार ठरले.
सचिन सानप हे कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देतील, अशा प्रकारची वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर कोण सचिन सानप मी त्यांना ओळखत नाही असे वक्तव्य मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच कलगी तुरा रंगला. येत्या 27 तारखेला होणाऱ्या मतमोजणी मध्ये कोण सचिन सानप हे अख्या महाराष्ट्राला समजेल, असे उदय सामंत यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे एक साधा प्राध्यापक आणि निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला सचिन सानप हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राजकीय चर्चेचा विषय ठरला. आता या राजकीय चर्चेमधून नेमके काय साध्य होणार? महायुतीच्या उमेदवाराचा विजय होणार की महाविकास आघाडीच्या उमेदवाराची पुन्हा लॉटरी लागणार हे येणाऱ्या 27 तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.