भंडारा डोंगर येथे उभारण्यात येत असलेल्या जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी ५ लाखाची देणगी

डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते बाळासाहेब काशिद व बापूसाहेब भेगडे यांच्याकडे धनादेश सुपूर्त

पुणे:“पवित्र तीर्थक्षेत्राचा ज्ञानतीर्थ क्षेत्रात विकास करून भंडारा डोंगराचे वैभवशाली स्वरूप जगासमोर साकार करायचे आहे. आपले हात घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी असतात. याच उदार अंतःकरणारने सर्वांनी मदत करावी.”असे आवाहन माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले.
जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी माईर्स एमआयटी शिक्षण समूहातील कर्मचारी कर्नल विलास तांदळे यांनी ५ लाखाचा धनादेश दिला. हाच धनादेश प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कर्नल तांदळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्याच प्रमाणे एमआयटीच्या पॉलिटेक्निक विभागातील लॅब असिस्टन्ट नारायण एकनाथ मुंडे यांनीही एका महिन्याचे संपूर्ण वेतन भंडारा डोंगराच्या सेवेसाठी दिले.
एमआयटीत आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, गिरीष दाते, डॉ. मिलिंद पात्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी व समाजाच्या सुसंस्कारासाठी भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणार्‍या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे सुवर्णजडित गाभारा मंदिर उपयुक्त असेल. यातून भारताच्या वैभवात भर पडेल. ”
बाळासाहेब काशिद म्हणाले, “भक्ती शक्तीचा मिलाप येथे पहायला मिळाला. डॉ. विश्वनाथ कराड यांची प्रेरणा घेऊन एमआयटी संस्था व येथील कर्मचार्‍यांकडून मिळालेल्या निधीचा खूप मोठा वाटा आहे. या डोंगरावरूनच संपूर्ण विश्वाला शांतीचा मंत्र दिला जाणार आहे. भंडारा डोंगर येथील संतांच्या भूमित येणार्‍या प्रत्येक भाविक भक्ताला सदैव आनंद, समाधान आणि शांती मिळते.”
बापूसाहेब भेगडे म्हणाले,“देश सेवक ते धर्म सेवक अशा स्वरूपाने कर्नल विलास तांदळे यांचे दर्शन घडले. त्यांनी उदार अंतःकरणाने दिलेली ही राशी नक्कीच सर्व दान कर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. भंडारा डोंगर येथील पवित्र स्थळाचे पावित्र्य व त्याचा अद्भूत इतिहास आपण कर्तव्य भावनेतून जपून ठेवावा.”

Leave A Reply

Translate »