‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन २५ ऑक्टोबरपासून

  • मीना कुर्लेकर यांची माहिती; वंचित विकास अभयाच्या वतीने एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे आयोजन

पुणे : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन येत्या २५, २६ व २७ ऑक्टोबर २०२४ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन यशस्वी उद्योजिका अनघा अजित चाफळकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर यांनी दिली. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, “वंचित विकास संस्था गेली चाळीस वर्ष स्त्रिया आणि मुलांमध्ये काम करते. छोट्या व्यावसायिकांचे प्रशिक्षण घेते व त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यंदा प्रदर्शनात २५ ऑक्टोबरला सायंकाळी खास महिलांसाठी होम मिनिस्टर हा खेळ, तर २६ ऑक्टोबरला सायंकाळी मुलांसाठी गंमत जत्रा असणार आहे. यासह दिवाळीच्या वस्तू, फराळ, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ, गिफ्ट आर्टिकल्स, कपडे, मुलांसाठी विज्ञान खेळणी, तसेच उत्तम प्रतीचा सुकामेवा निम्म्या किमतीत उपलब्ध असेल. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.”

या प्रदर्शनात वापरण्यायोग्य कपडे, भांडी, वर्तमानपत्राची रद्दी आणि सर्व प्रकारचे ई-वेस्ट संकलित केले जाणार आहे. वंचित विकास प्रबोधनाचे काम करते. प्रत्येक भारतीयाने मतदान करावे, असे जागृती अभियानही या प्रदर्शनातून केले जाणार आहे. एकल महिलांच्या सन्मानासाठी अभया संबोधावे, असा शासन आदेश येण्यासाठी सही अभियानही करणार आहोत. दिवाळीच्या निमित्ताने पुण्यामध्ये अनेक प्रदर्शने असतात. पण सामाजिक संस्थेने महिला उद्योजकांसाठी आयोजित केलेले हे प्रदर्शन आहे. या छोटया व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जरुर यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ची वैशिष्ट्ये

  • छोट्या व महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन, आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यासपीठ
  • दि. २५ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत विनामूल्य खुले
  • उत्तम प्रतीचे ड्रायफ्रूट निम्म्या किमतीत उपलब्ध होणार
  • शाळेतील मुलांनी बनवलेल्या हात कागदाच्या वस्तू
  • बचत गटातील महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ असतील
  • हँडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन, फराळ आदी

Leave A Reply

Translate »