पं. सतीश तारे यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान

– शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याने पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची सांगता


पुणे : कलाश्री संगीत मंडळ व द औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार’ यंदा पं. सतीश तारे यांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाच्या सांगता समारंभात पं. सतीश तारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंकज महाराज गावडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, अजित गायकवाड, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे परीक्षक पं. रामराव नायक, कुलसचिव विश्वासराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, द औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत गायकवाड, राधिका गायकवाड आदी उपस्थित होते.
पंकज महाराज गावडे म्हणाले, की भारतीय परंपरा महान आहे. आज जगातील ३५ टक्के लोक तणावात जीवन जगत आहेत. त्यांना संगीतातील राग बाहेर काढण्याचे काम करतात.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, की छंद जोपासल्याने मन मोकळे होते. त्यामुळे छंद जोपासले पाहिजेत. कलेची साधना केली पाहिजे.
सतीश तारे म्हणाले, की काम करतानाची तळमळ, जिद्द आहे, याची दखल घेतल्याचे समाधान आहे.
तत्पूर्वी, उस्ताद अर्शद अली खान यांनी राग मेघ बडाख्यालमध्ये गायनाला सुरुवात केली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या गायनाचे स्वागत केले. बाहेर पाऊस सुरू असतानाच त्यांनी ताल त्रितालमध्ये ‘बादल वा बरसन लागे’ सादर केलेली बंदिश टाळ्या मिळवून गेली. त्यानंतर ‘ऐसो सुघर सुंदर’ ही यमन रागातील बंदिश सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर त्यांनी तराना सादर केले व ‘बाजे मुरलीया बाजे’ या भजनाने आपल्या गाण्याचा शेवट केला.
महोत्सवाची सांगता नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याने झाली. त्यांनी अर्धनारी नटेश्वर स्तुती, ताल त्रितालमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तिहाई व परण आमद सादर करीत रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. त्यानंतर चक्रधर परण, शिव कवित्व, जननी गतभाव तसेच किशोरी आमोणकर यांची ‘श्याम सुंदर मनमोहना’ बंदिश सादर केली. दृत तीनताल व कथकद्वारे रसिकांसोबत संवाद साधला. रसिकांनी उभे राहत टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.

Leave A Reply

Translate »