डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’वर शतकोत्तर जागतिक परिषद लंडन येथे संपन्न

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ‘ दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अंड इटस सोल्युशन’ या विषयावरील प्रबंध डी.एस्सी पदवीसाठी सादर केला होता. याच्या शतकपूर्ती निमित्त सायास सहकारी संस्था, पुणे आणि मराठी अर्थशास्त्र परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे जागतिक परिषदेचे आयोजन केले होते. नुकत्याच भरवण्यात आलेल्या या जागतिक परिषदेत भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करणारा लेखाजोखा मांडण्यात आला.

या परिषदेसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा.डॉ.जरेमी झ्विगेलर ,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे डॉ.फ्रान्सिस्को ट्रिकांडो मुनोरा , मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण व संजय देशमुख, आय.डी.बी.आय बँकेचे माजी चेअरमन किशोर खरात , दिल्ली विद्यापीठाचे प्रा.डॉ.संजोय रॉय, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी जनरल मॅनेजर दीपक कांबळे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेसाठी ६ ते १२ जून २०२४ या कालावधित भारतातून ३१ प्रतिनिधी आणि इतर ठिकाणावरून १४ प्रतिनीधी लंडनमध्ये दाखल झाले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेचे माजी संचालक रविंद्र चव्हाण, डॉ.केशव पवार, डॉ.गजानन पट्टेबहादूर, डॉ.संजोय रॉय, प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, अँड.विजयालक्ष्मी खोपडे, डॉ.सध्या नारखेडे, डॉ.वृषाली रणधीर, डॉ.मेघना भोसले, सौ. मंगला चव्हाण ,डॉ. सुधीर मस्के, अँड समाधान सुरवाडे, अविनाश देवसटवार आदींचा सहभाग होता.

लंडन येथील किंग्ज हेन्री रोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रहात होते त्या घराला भेट देवून परिषदेची सुरूवात झाली. तर ११ जुन २०२४ रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जवळील ग्रेज इन हॉल मध्ये झालेल्या या जागतिक परिषदेचे उद्घाटन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांनी समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन केले. दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक परिप्रेक्षातून भारताच्या आर्थिक प्रश्नावर दिशादर्शक भाष्य करणारे पुस्तक लवकरच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रेस तर्फे प्रकाशित करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Leave A Reply

Translate »