पुण्यात पैशांचे ट्रक आले आहेत, मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांच्या आरोपावर पलटवार

पुणे : राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. येत्या १३ तारखेला चौथ्या टप्प्यातील मतदारसंघात मतदान होणार आहे. अशातच पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात पैशांचे ट्रक आले आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते आज वाटप करतील असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यावर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांच्या आरोपावर चांगलाच पलटवार केलाय.

पुण्यात दोन दिवसापासून भाजपची दादागिरी, गुंडगिरी सुरू झाली आहे. प्रचंड प्रमाणात पुण्यात पैशाचे ट्रक येऊन थांबले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात करोडो रूपये आहेत. त्याचे वितरण देवेंद्र फडणवीस करतील. त्याचा वाटप आज करणार. पोलिस खाते देखील त्याकडे दुर्लक्ष करणार. निवडणुक आयोग देशाचं ऐकत नाही तर माझं कुठून ऐकणार. असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपावर मुरलीधर मोहोळ यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांना कुठलं तरी विधान करण्याची, मोठ्या नेत्यांवर टिका करण्याची सवय झाली आहे. पुणेकर हे सुज्ञ असून त्यांना काय चालू आहे, ते सगळं समजतंय. एकदा दोनदा केलं की ते पचून जातं, परंतु वारंवार तेचं केलं की त्या कुठल्याच गोष्टीवर लोकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे सरळसरळ निवडणुक लढली पाहिजे. हेल्दी निवडणुक झाली पाहिजे. उगाचच काही तरी बोलायचं. त्याला काही अर्थ आहे का ? असा खोचक सवाल देखील मुरलीधर मोहोळ यांनी केलाय.

दरम्यान, अलिकडेच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत देखील रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. आता मतदान करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतांना रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटप करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुणेकरांना या आरोपांवर नेमकं काय वाटतं ? ते येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानातून दाखवून देणार अशी शक्यता आहे.

Leave A Reply

Translate »