समाजात बंधुतेचा विचार रुजविण्याची गरज

शंकर आथरे यांचे प्रतिपादन; चोविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुणे : “आज समाज विविध जाती आणि धर्मामध्ये विभागला आहे. अशावेळी बंधुतेची पताका हाती घेऊन समानतेच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आस असलेले वारकरी घडविले पाहिजेत. दिवसेंदिवस दुभंगत चाललेल्या समाजामध्ये पुन्हा एकसंधपणा आणायचा असल्यास बंधुतेचा विचार खोलवर रुजविण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन चोविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या संस्थाच्या वतीने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. बंधुतेची ज्योत प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक सायमन मार्टिन, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष दंतरोपण तज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे, निमंत्रक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश जवळकर, लेखक-कवी चंद्रकांत वानखेडे, संयोजक व मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभंजन चव्हाण उपस्थित होते.उद्घाटनावेळी 

मेघना पाटील (डोंबिवली), दिवाकर जोशी (परळी वै.), रघु देशपांडे (नांदेड), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), रघु गरमडे (चंद्रपूर), राजू आठवले (सिल्लोड), रामदेव सित्रे (अकोला), अनुया काळे (मुरबाड) यांना ‘बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली काव्य पंढरी कवी संमेलन झाले. कवी गुलाब राजा फुलमाळी यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, कवी किशोर भुजाडे यांना ‘लोक गायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ आणि कवी अमोल घाटविसावे यांना ‘पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

शंकर आथरे म्हणाले, “लेखकाने सूक्ष्म निरीक्षणातून मांडणी करत समाज कायम जागता ठेवण्याचे काम केले पाहिजे. चिंतनशील व प्रबोधनात्मक लेखनाने समाजातील संवेदनशील मन घडवतानाच चांगल्या मार्गावर नेण्याचे काम केले पाहिजे. बंधुतेचा विचार जाती-धर्माचा भेद विसरून एकत्रित नांदायला लावण्याची प्रेरणा देतो. महाराष्ट्रात प्रबोधनाचा मोठा वारसा आहे. हा वारसा जपण्याचे काम अशा साहित्य संमेलनामधून होतो. नव्या पिढीमध्ये राष्ट्राभिमान जागृत ठेवत मूल्यशिक्षणाचा प्रचार करणे आणि बंधुता चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.”

सायमन मार्टिन म्हणाले, “जग घडविण्यामध्ये साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. आज माणूस जात, धर्म, वर्ण, पंथ, भाषा, प्रांत यामध्ये विभागला गेला आहे. दुसऱ्यांचे अस्तित्व आणि विचार मान्य करायचे नाहीत अशा टोकापर्यंत समाज पोहोचलेला आहे. हा विचार दूर करण्यासाठी बंधुतेचा विचार पुढे आणला पाहिजे. यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतात व त्यातून समाजाच्या संवेदना जागृत राहतात.”

प्रकाश रोकडे म्हणाले, “साहित्यिक आणि कलावंताची एकच भाषा असते ती म्हणजे देश. आज जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहिल्यामुळे देशात भयाचे व चिंतेचे वातावरण आहे. देशात पुन्हा एकदा इंग्रजांच्या गुलामगिरीप्रमाणेच व्यवस्थेची गुलामगिरी येते की काय अशी स्थिती असून, सहिष्णुता आणि मानवता धोक्यात आली आहे. या काळामध्ये बंधुता समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविले पाहिजे.”

प्रकाश जवळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुर्के यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Translate »