आदर्श व्यक्तींचे कार्य समाजाला, नव्या पिढीला प्रेरक 

खासदार श्रीनिवास पाटील यांचे मत; टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे ‘एक्सलन्स अवॉर्ड’चे वितरण

पुणे : “पुण्यात घडलेली प्रत्येक व्यक्ती एक संस्था व विद्यापीठ आहे. एकमेकांच्या साथीने प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या अशा आदर्श व्यक्तिमत्वांचे कार्य समाजाला प्रेरक असते. पुरस्कारांच्या माध्यमातून अशा आदर्शांना नव्या पिढीसमोर ठेवले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे,” असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अवॉर्डस ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. खराडी येथील हॉटेल रॅडीसन ब्लू येथे झालेल्या सोहळ्यावेळी सौ. बाहरी मल्होत्रा, लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग, ‘टीएमसी’चे अध्यक्ष अश्विनी मल्होत्रा, महासचिव डॉ. जयसिंग पाटील, जेनीस सोमजी आदी, सुंद्री परचानी आदी उपस्थित होते.

उद्योजक अतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अरविंद नातू (विज्ञान व तंत्रज्ञान), जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके (सार्वजनिक आरोग्य), पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके (प्रशासन), टेक्नोक्रॅट आनंद शिराळकर (युवा उद्योजक), पॉवरलिफ्टर नीता मेहता (क्रीडा) यांना सन्मानित करण्यात आले.

श्रीनिवास पाटील म्हाणाले, “पुणे विद्येचे, संस्कृतीचे, देवालयाचे माहेरघर आहे. ही संस्कृती आपण जपली पाहिजे. समाजात अनेक गरीब व गरजू लोक आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यायला हवा. सर्वाना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग साधायला हवा. वाहतूक कोंडीसह पुण्यातील इतर नागरी प्रश्न सोडविण्यावर काम होण्याची गरज आहे.” ज्या जिजाऊंनी पुण्याची उभारणी केली, त्यांचे नाव पुण्याला देण्याचा विचारप्रवाह जोर धरतोय, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 किर्लोस्कर ग्रुपच्या माध्यमातून उभारलेल्या कार्याचा हा गौरव असून, त्याचा नम्रपणे स्वीकार करत असल्याची भावना अतुल किर्लोस्कर यांनी व्यक्त केली. संदीप कर्णिक, संतोष ढोके, आनंद शिराळकर, डॉ. सुभाष साळुंके यांनीही सत्काराला उत्तर देत आपली मनोगते व्यक्त केली. अश्विनी मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. जुही मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयसिंग पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »