वनराई इको क्लब रणार ४०० शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती

पुणे : मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी यांच्या सहकार्यातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासाचा कार्यविस्तार पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी वनराईची पर्यावरण वाहिनी काम करत असून राज्यातील ४०० शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यात येणार आहे. पर्यावरणाचे शिक्षण लहान मुलांपासून ते घराघरापर्यंत पोहचविण्याच्या उद्दिष्ठाने वनराईची पर्यावरण वाहिनी काम करत आहे. लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे बीजे रोवणे, त्यांना पर्यावरणाप्रती संवेदनशील आणि कृतीशील बनविण्यासाठी वनराई संस्थेने नुकतेच पुण्यात शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

खा. वंदना चव्हाण म्हणाल्या की, प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न केले तरच पृथ्वीवरिल कार्बन उत्सर्जन कमी होईल. लहानपणापासूनच आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींना शीस्त लावण्याचे काम शिक्षक करत असतात. पर्यावरणाच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या उदयाच्या नागरिकांना म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाप्रती संवेदनशील व कृतीशील बनवणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी पर्यावरण वाहिनींच्या माध्यमातून वनराईने पुढाकार घेतला त्याचे विशेष कौतुक वाटत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनराईचे सचिव अमित वाडेकर यांनी केले. खा. वंदना चव्हाण, महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष शेषराव पाटील, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, विश्वस्त गिरिष गांधी, वनराई पर्यावरण वाहिनीचे प्रकल्प संचालक भारत साबळे उपस्थित होते. यावेळी इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त गुरुदास नूलकर, डॉ. महेंद्र घागरे, डॉ. दिगंबर मोकाट यांनी पर्यावरणातील विविध विषयावर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

रविंद्र धारिया म्हणाले, बालमनावर पर्यावरणाचे संस्कार रुजवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमधून शिक्षकांनी कृतीशील सहभाग घ्यावा व परिसरात स्वच्छता, प्रदुषणमुक्त वातावरण निर्माण करुन आपली शाळा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार घराघरापर्यंत पोहचवून पर्यावरण सक्षम पिढी घडविण्याचे व आपला भारत निरोगी, हरित व प्रदुषण मुक्त करण्याचे आवाहन धारिया यांनी यावेळी केले.

अमित वाडेकर म्हणाले की, सन 2002 पासून वनराई पर्यावरण वाहिनींचा कृती कार्यक्रम शाळा शाळांमधून राबवला जात आहे.  या कार्यक्रमाअंतर्गत विदयार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनवण्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पर्यावरण सांस्कृतिक स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ, स्वच्छ -सुंदर शाळा, औषधी वनस्पती बाग इ. स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या शिवाय जल संवर्धन, वृक्षारोपण, घनकचना व्यवस्थापन, प्लास्टिक कचरामुक्त शाळा व घराभोवतालचा परिसर याचे महत्व विदयार्थ्यांना पटवून देऊन, विदयार्थ्यामध्ये पर्यावरणाचे संस्कार रुजवून पर्यावरण संवर्धनाचा विचार घराघरांमध्ये पोहचवण्याचे कार्य गेली २० वर्ष अव्याहतपणे सुरु आहे.

शेषराव पाटील म्हणाले की, देशात व राज्यात असणारी वने, जैवविविधता, प्राणी, पक्षी हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेळीच त्याला आवर घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रयत्न करायला हवे आहेत.

गिरिष गांधी म्हणाले की, अजूनही समाजामध्ये शिक्षकांवर विश्वास ठेवला जातो. त्यांच्या विचारांना समाजात महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे आधुनिक काळाप्रमाणे शिक्षकांनी स्वत:ला अपडेट ठेवावे व देशहिताच्या कार्यात सामाजिक जाणिवेतून सहभागी व्हावे.

डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा निसर्गावर परिणाम होत असतो. उद्योगधंद्यांना आणि कच्चा माल यासाठी निसर्गाचा आधार घ्यावा लागतो. स्वत:च्या प्रगतीसाठी माणूस निसर्गाला आपण गृहीत धरतो. त्यामुळे निसर्ग वाचवायचा असल्यास नवीन पिढीसमोर पर्यावरणपूरक वस्तू, सेवा व उद्योगांचे पर्याय ठेवल्यास निश्चितच त्याचा फायदा होईल.

डॉ. दिगंबर मोकाट म्हणाले, आयुष मंत्रालय व औषधी वनस्पती सुविधा केंद्र यांच्यामार्फत असणा-या सर्व योजना शाळांमध्ये पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक शाळांमध्ये औषधी वनस्पती बाग निर्माण करण्यासाठी मोफत रोपे व त्यासंबधी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे मोकाट म्हणाले. 

Leave A Reply

Translate »