रिअल इस्टेट क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठात सामंजस्य करार

पदव्यूत्तर पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाला होणार सुरुवात

पुणे : रिअल इस्टेट क्षेत्रात गरजेचे असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि शास्रशुद्ध शिक्षण मिळावे आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना योग्य संधी उपलब्ध व्हावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांची आघाडीची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रो आणि उच्चशिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एमआयटी-एडीटी विद्यापीठ यांच्यावतीने पुढाकार घेण्यात आला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट हा पदव्यूत्तर पदविका आणि बॅचलर्स इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (रिअल इस्टेट अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट) असे दोन नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आज शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची आणि याद्वारे उपलब्ध होत असलेल्या दोन अभ्यासक्रमांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम)च्या अधिष्ठाता डॉ. सुनीता कराड, क्रेडाई पुणे-मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जयप्रकाश श्रॉफ, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या अधिष्ठाता रजनीश कौर बेदी, हेड ऑफ डिपार्टमेंट प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आशा ओक हे उपस्थित होते.

अभ्यासक्रमांविषयी माहिती देताना एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता कराड म्हणाल्या, “एक वर्षाचा पदव्यूत्तर पदविका आणि तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम यामध्ये बांधकाम व्यवसायाशी संबंधित प्राथमिक शिक्षण देण्यात येईल. यात बांधकाम साहित्याची खरेदी, साईट व्यवस्थापन, कायदेशीर बाबींचे ज्ञान, इआरपी व्यवस्थापनाचे ज्ञान याबरोबरच इतर आवश्यक कौशल्यांचा विकास याविषयीचे शिक्षण देण्यात येईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जुलै २०२२ पासून लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.”

पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमात दोन सत्र शैक्षणिक तर तिसरे सत्र इंटर्नशिपचे असेल. यात प्रत्यक्ष बांधकाम साईट किंवा क्रेडाई कार्यालयात आयोजित कार्यशाळा आदीचा समावेश असेल. तर पदवी अभ्यासक्रम सहा सत्रात विभागला असून यातील पाच सत्र शैक्षणिक आणि एक सत्र इंटर्नशिपचे असेल. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर व्यक्तीला पदविका अभ्यासक्रमाला तर प्रवेश घेता येईल. तसेच कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरेल. पदवी अभ्यासक्रमासाठी ६० व पदव्यूत्तर पदविका अभ्याक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. या अभ्यासक्रमांसाच्या प्रवेशासाठी असलेल्या निवड प्रक्रियेत ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीचा समावेश असेल. तसेच प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती देण्याचा विचारही विद्यापीठाने केला आहे”, असेही डॉ. कराड यांनी यावेळी सांगितले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, “बांधकाम उद्योग क्षेत्रात तांत्रिक आणि कौशल्य प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो आणि एमआयटी-एडीटीची ही भागीदारी महत्त्वाची ठरेल. भारतातील बांधकाम व पायाभूत सुविधांचा विकास हे क्षेत्र लवकरच सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करणारे क्षेत्र होईल असे चित्र आहे. पुण्यातील क्रेडाईच्या सदस्यांची संख्या, रिअल इस्टेट क्षेत्रात होत असलेली कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेता या अभ्यासक्रमांमधून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नजीकच्या काळात हे क्षेत्र ७६ दशलक्ष व्यक्तींना रोजगाराच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असे अनुमान आहे. सध्या या क्षेत्राने सुमारे ६० दशलक्ष व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.”

कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जय प्रकाश श्रॉफ म्हणाले, “रिअल इस्टेट क्षेत्रातील हा वेगळ्या प्रकारचा उपक्रम ठरणार आहे. या क्षेत्रातील ज्ञान, शिक्षण मिळण्यासाठी एखादी संघटना आणि शैक्षणिक संस्था यांच्या पुढाकाराने होणारा हा पहिला उपक्रम आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. रिअल इस्टेट क्षेत्रातील ही गरज या अभ्यासक्रमांमधून पूर्ण होणार आहे. या क्षेत्राची आवड असणाऱ्या आणि कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेता येईल. यामुळे बांधकाम क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण होणार असून रोजगार देखील उपलब्ध होतील.”

पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी संपूर्ण फी १,२५००० रुपये असून तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रमासाठी प्रति वर्ष १,७५००० रुपये इतकी फी असणार आहे.

फोटो ओळ – आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत क्रेडाई पुणे मेट्रो आणि एमआयटी एडीटीतर्फे रिअल इस्टेट क्षेत्रातील अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली. यावेळी डावीकडून डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. सुनीता कराड, रणजित नाईकनवरे आणि जयप्रकाश श्रॉफ उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »