Kedar Shinde’s Baipan Bhaari Deva to be released on 28 January 2022

Pune (P&V news service):- Director Kedar Shinde will give his fans the treat of ‘Baipan Bhari Deva’ in the new year. The movie will be released on January 28, 2022 in the new year. Filmmaker Kedar Shinde has released the first poster for his all-woman Marathi film titled Baipan Bhaari Deva.

‘बाईपण भारी देवा’ – केदार शिंदेचा नवा सिनेमा 

– २८ जानेवारी २०२२ ला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित ! 

– माधुरी भोसले यांच्या ‘स्क्रीनशॉट्स’ची निर्मिती.

एका मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शनासाठी तयार असलेली एक सुंदर कलाकृती अखेर २८ जानेवारी २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. माधुरी भोसले यांच्या ‘स्क्रीनशॉट्स’ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ हा केदार शिंदे दिग्दर्शित  चित्रपट, एक सुंदर विषय घेऊन येत आहे. 

स्त्रीत्त्वाचे विविध पैलू प्रभावीपणे हाताळत त्यावर पॉवरफुल चित्रपट निर्मितीत केदार शिंदेचा हातखंडा आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्गबाई अरेच्चा’ या सुपरहिट चित्रपटानं विनोदी ढंगात स्त्रीच्या मनाचा एक प्रभावी पैलू, ज्या विनोदी ढंगात उलगडला त्या ‘फँटसी शैली’ला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. मग केदार शिंदेच्या ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ पासून अगदी अलिकडच्या काळातील ‘अग्गबाई अरेच्चा 2’ सारख्या अनेक  चित्रपटांना प्रेक्षकांनी  मनापासून दाद दिली.  शिवाय केदारची ‘सही रे सही’सारखी अनेक लोकप्रिय नाटकं आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ सारख्या, दर्जेदार मालिका वर्षानुवर्षे आपल्या खास लक्षात राहतात !

स्त्रियांमधील अनेक ज्ञात – अज्ञात अशा प्रभावी पैलूंना अधोरेखित करणारा केदारचाच हा पुढचा चित्रपट, त्याच्या इतर कलाकृतींइतकाच प्रभावी असणार ! ‘नो टेन्शन फुल टशन’ सांगत चित्रपटाचं एक खास पोस्टर देखील आज प्रदर्शित झालं. शिवाय महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नसल्या तरी त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची तारीख जाहीर करून ‘ताई – माई – आक्का’ला या पोस्टर मधून एक गमतीदार साद घातली आहे ! या पोस्टरमुळे या चित्रपटाविषयी जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे….. ‘पोस्टर’मधली नायिका कोण आहे ? पोस्टरमधील ती नायिका तिच्या पाठीवर, ती निभावत असलेल्या वेगवेगळ्या नात्यांतील भूमिका मिरवत ठामपणे  का उभी आहे ? …….. केदारच्या चित्रपटांमधली पात्रं कायमच औत्सुक्याचा विषय ठरतात. या चित्रपटात कोणती पात्रं आहेत ? चित्रपटातील कलाकार कोणते ?…. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला २८ जानेवारीला मिळतील !

एका रेडिओ वाहिनीमध्ये अनेक वर्ष ‘क्रिएटिव्ह हेड’ म्हणून काम केलेल्या माधुरी भोसले यांचा ‘निर्माती’ म्हणून हा पहिला चित्रपट असून स्त्रीच्या ‘बाईपणा’तला, ‘भारीपणा’ त्यांना कायमच भावतो. हा विषय माधुरीजींच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांनी उचलली. स्त्रीच्या प्रत्येक नात्याला स्पर्श करणारा हा कौटुंबिक चित्रपट म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनाचं प्रतिबिंब आहे !

प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचं सिद्ध झालेलं कर्तृत्त्व आपल्याला माहित आहे, शिवाय येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमार्फत सत्तेतही त्या अर्ध्या भागीदार असणार आहेत ! समाजातील या सगळ्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर ‘बाईपण भारी देवा’ नक्कीच भारी ठरेल !

हा चित्रपट म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी, निखळ मनोरंजनाचं एक ‘फुल पॅकेज’ असणार आहे ! ‘आयुष्य जगण्याची कला’ सॉलिड गंमतीदारपणे सांगणारा हा चित्रपट म्हणजे, ‘नो टेन्शन, फुल टशन !’

केदार शिंदे यांचे निवेदन (चौकटीत) :

केदार शिंदे म्हणाले, “कोरोनाकाळातील टेन्शननंतर हा चित्रपट म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी असणारं एक परिपूर्ण मनोरंजन आहे, शिवाय कोणतही मनोरंजन हे फक्त विनोदापुरतं मर्यादित न राहता त्यात प्रेक्षकांना आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब देखिल दिसायला हवं असं मला वाटतं. स्त्रीच्या मनाचा वेध घेणारा हा चित्रपट मी माझ्या आईला, बहिणीला, बायकोला, मुलीला आणि ज्यांच्यांमुळे मी आहे अशा सर्व स्त्रियांना समर्पित करत आहे ! मला खात्री आहे प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबाला हा सिनेमा त्यांचा स्वतःचा आहे असं वाटेल !”

Leave A Reply

Translate »