पुण्यात रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा भव्य प्रारंभ

एमआयटी-एडीटी विद्यापीठात वर्ल्ड पीस डोम येथे रंगली भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धा

पुणे : रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि STEM शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रगण्य उपक्रम असलेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ ला पुण्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या वर्ल्ड पीस डोम येथे झालेल्या उद्घाटन समारंभात देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभरातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक रोबोट्सच्या सहभागाने ही स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरली आहे. शासकीय शाळा, खाजगी संस्था तसेच वंचित समाजघटकातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीच्या स्पर्धेत ग्रामीण आणि आदिवासी भागातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याने STEM आणि रोबोटिक्स शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व्यासपीठ मिळाले आहे. कार्यक्रमात रोबोटेक्स इंडिया २०२४ चा प्रवास दर्शवणारा विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. शेवटी डॉ. शांतिपाल ओहोल यांनी आभार प्रदर्शन करून औपचारिक उद्घोषणा केली आणि प्रा. सुनीता कराड यांच्या शुभ हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली.

उद्घाटन प्रसंगी MIT-ADT विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका प्रा. सुनीता कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत प्रमुख पाहुण्यांमध्ये रोबोटेक्स इंटरनॅशनलच्या प्रमुख अ‍ॅनेली पिक्केमेट्स, रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल, पुणे FICCI Flo च्या माजी अध्यक्षा पिंकी राजपाल,
ZS असोसिएट्स (गव्हर्नन्स, रिस्क, कंप्लायन्स) ग्लोबल डायरेक्टर अली खान, आयकर विभागाचे मुख्य आयुक्त विवेक वाडेकर, HCL फाऊंडेशन असोसिएट जनरल मॅनेजर रॉबिन थॉमस, स्टर्लाईट टेक्नॉलॉजीज CSR मॅनेजर मनीष तयाडे, BMC सॉफ्टवेअर सीनियर मॅनेजर फायनान्स गिरीश क्याडिगुप्पी, CIET NCERT नवी दिल्ली चीफ इन्फॉर्मेशन अँड सिक्युरिटी ऑफिसर डॉ. राजेश जी, उद्योजक व राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला, फिनोलेक्स इंडस्ट्रीज माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल व्हाबी, COEP सहयोगी प्राध्यापक डॉ. शांतिपाल ओहोल, ग्रे मॅटर कन्सल्टिंग कार्यकारी संचालक संतानू घोषाल, फिनोलेक्स इंडस्ट्रीज हेड – अॅनालिटिक्स अभिजीत डेका या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

रोबोटेक्स इंडिया ही केवळ स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव आहे. गाव, शहर, खेड्यातील मुले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा समस्यांचे निराकरण करतात, तेव्हा ‘विकसित भारत’ घडण्याचे दर्शन घडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि डिजिटल भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, ही स्पर्धा भारताच्या तरुण नवोन्मेषकांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे काम करते,” असे रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल यांनी सांगितले.

“भारताला भविष्य तयार करण्यासाठी सक्षम करणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देते. प्रत्येक स्पर्धक विजेता आहे, कारण त्यांनी नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचा मार्ग स्वीकारला आहे,” अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

रोबोटेक्स इंडियाने आजवर देशभरातील १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर परिणाम घडवला असून, ५०० पेक्षा जास्त रोबोटिक्स एआय लॅब्स आणि १० हजारांहून अधिक शासकीय शिक्षकांचे प्रशिक्षण या माध्यमातून नव्या पिढीला भविष्याची तयारी करून दिली आहे. “Girls Who Build Robots” या उपक्रमामुळे मुलींना STEM क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले आहे.

Leave A Reply

Translate »