सागर धारिया यांची नॅबफाउंडेशन’च्या ‘रणनीती आणि मार्गदर्शन समिती’च्या सदस्यपदी निवड

0

पुणे – ‘नॅबफाउंडेशन’च्या ‘रणनीती आणि मार्गदर्शन समिती’चे सदस्य म्हणून सागर धारिया यांची नुकतीच निवड झाली आहे. ‘नॅबफाउंडेशन’ हि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामीण लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके’ने (NABARD) स्थापन केलेली एक उपकंपनी आहे. सागर धारिया हे ‘वनराई’ संस्थेचे विश्वस्त असून शाश्वत ग्रामीण विकासातील त्यांचे काम पाहता त्यांचा हा अनुभव ‘नॅबफाउंडेशन’च्या उपयोगी पडेल असा विश्वास संस्थेने त्यांची नियुक्ती करताना व्यक्त केला आहे.

‘नाबार्ड’ ही भारत सरकारची राष्ट्रीय शिखर विकास बँक आहे. कृषी-वित्त, पायाभूत सुविधांचा विकास, बँकिंग तंत्रज्ञान, स्वयं-सहाय्यता गट यांद्वारे ‘नाबार्ड’ साधारण चार दशकांपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. केंद्र आणि राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, बँका, कृषी विद्यापीठे आणि इतर अनेक भागीदारांच्या सहकार्यातून हजारो विकास प्रकल्प राबवण्याच्या प्रदीर्घ अनुभवानंतर ‘नाबार्ड’ आता ‘नॅबफाउंडेशन’च्या स्वरूपात आपला कार्यविस्तार करत आहे.

‘नॅबफाउंडेशन’ची रणनीती आणि मार्गदर्शन समिती ही प्रमुख सल्लागार म्हणून काम करते. ‘नाबार्ड’च्या ध्येय-धोरणांशी सुसंगत पुढील वाटचाल सुनिश्चित करण्यासाठी, तसेच विविध भागधारकांच्या सहकार्यातून कृषी – ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिशादर्शक कार्यक्रमाची आखणी करणे हे या समितीचे मुख्य काम असणार आहे.

सागर धारिया म्हणाले की, भारतभूमीला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी ‘वनराई’ संस्था गेल्या चार दशकांपासून तळागाळात काम करत आहे. प्रामुख्याने वनीकरण, पाणलोट व्यवस्थापन, शेती – पशुधन विकास आणि उपजीवीका विषयक प्रकल्प शेकडो गावांमध्ये आजपर्यंत राबवले आहेत. यातूनच शहरातून खेड्याकडे ‘उलट दिशेने स्थलांतर’(Reverse Migration) घडवून आणण्यात ‘वनराई’ने यश मिळवले आहे. ‘नॅबफाउंडेशन’सुद्धा लोकसहभागातून शाश्वत ग्राम विकास या ध्येयासाठी काम करत असल्याने अधिक व्यापक स्तरावर काम करण्यासाठी ही निश्चितपणे एक संधी आहे. म्हणूनच या समितीचे सदस्यपद स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »