महापौर ते स्थायी समिती अध्यक्ष… सर्वत्र बिनविरोध! पुणे पालिकेत नवा पॅटर्न; बिडकरांची रणनीती कामी

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी स्पष्ट बहुमत देत भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता दिली. यानंतर झालेली महापालिकेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया यंदा वेगळ्याच पद्धतीने पार पडली. तब्बल ११९ नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणे, हा यंदाच्या कार्यकाळातील विशेष पैलू ठरला आहे.

महापौरपदी मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूर्वीच्या कार्यकाळात या पदांसाठी विरोधकांकडून उमेदवार उभे राहत असत; मात्र यंदा भाजपकडून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी समन्वयाची रणनीती अवलंबत विरोधकांशी संवाद साधला. राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही महापौर व उपमहापौर पदासाठी दिलेल्या उमेदवारांची माघार घेतली.

 

भाजपकडून सभागृह नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवत निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडली. महानगरपालिकेमध्ये यंदा सर्व महत्त्वाच्या पदांची बिनविरोध निवड घडवून आणण्यात बिडकर यांच्या राजकीय रणनीतीची निर्णायक भूमिका राहिल्याचे स्पष्ट दिसून आले.

 

भाजपकडे मोठे बहुमत असतानाही विरोधकांकडून आपले उमेदवार देत प्रत्यक्ष निवडणूक घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र बिडकर यांनी केवळ संख्याबळावर विसंबून न राहता संवादाचा मार्ग स्वीकारला. विविध पक्षांतील वरिष्ठ नेत्यांशी वैयक्तिक संपर्क, गटनेत्यांसोबत संवाद आणि समित्यांवरील प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून त्यांनी वातावरण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत जाण्यापासून रोखले.

 

आज स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांचीही बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास टिंगरे यांचा अर्ज वेळेत न भरल्याने अवैध ठरला आणि निवडणूक एकतर्फी झाली. याशिवाय विधी समिती अध्यक्षपदी स्वरदा गौरव बापट, शहर सुधारणा समिती अध्यक्षपदी स्मिता वस्ते, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी अल्पना गणेश वरपे, शिक्षण समिती अध्यक्षपदी अरुण राजवाडे, नाव समिती अध्यक्षपदी पल्लवी जावळे आणि क्रीडा समिती अध्यक्षपदी नारायण गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली.

 

भाजपाच्या स्पष्ट बहुमतासोबतच संवाद आणि समन्वयावर आधारित व्यूहरचनेमुळे सर्व महत्त्वाच्या पदांची बिनविरोध निवड शक्य झाली. या प्रक्रियेत सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या राजकीय कौशल्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.

Translate »