पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या १०० व्या जयंती निमित्त उलगडला संघर्षमय, राजकीय व सामाजिक प्रवास

पुणे – पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी दिनाच्या औचित्याने पुढील वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 200 गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलसंधारणाची आणि ग्रामीण विकासाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचबरोबर डॉ. धारिया यांचे कार्य पुढील पिढ्यांसमोर यावे यासाठी वनराई तर्फे विविध उपक्रम वनराई राबविणार आहे. भविष्यातील पर्यावरण, हवामान, प्रदूषण आदी संकटे विचारात घेता वनराई संस्थेच्या वतीने त्याविषयीची चर्चा व परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये पुण्यासह, महाराष्ट्रातील आणि भारतातील भविष्यातील समस्या निर्माण होणार आहेत, त्याविषयीच्या उपाययोजना काय करता येतील याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी वनराईचे विश्वस्त सागर धारिया, साधना धारिया श्रॉफ, सचिव अमित वाडेकर, बबन कांकीरड उपस्थित होते.

सागर धारिया म्हणाले की, खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी  २०० गावांमध्ये जलसंधारण आणि सर्वांगीण ग्रामीण विकासाचे विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. चार दशकांपूर्वी पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा आदरणीय अण्णांनी भारतभूमीला पुन्हा एकदा ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवण्याच्या ध्यासातून ‘वनराई’ची स्थापना केली. लोकचळवळीतून हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्याबरोबरच जलसमृद्ध, स्वच्छ, हरित, जैववैविध्यपूर्ण आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त असा भारत घडवण्यासाठी ‘वनराई’ आज देशपातळीवर कार्यरत आहे. या कार्यमोहिमेचा भाग म्हणून नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, परिसंस्था पुनरुज्जीवन आणि शाश्वत ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत वनीकरण, मृदा-जल संधारण, कृषी-पशुधन विकास, उपजीविका, शिक्षण, स्वच्छता-आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठीचे हे रचनात्मक कार्यक्रम लोकसहभागातून राबवण्यासाठी याला पूरक-पोषक प्रबोधन होणेही तितकेच आवश्यक आहे.

अमित वाडेकर म्हणाले की, डॉ. धारिया यांची खासदार अथवा केंद्रीय मंत्री म्हणून केलेली लोकसभा आणि राज्यसभांमधील भाषणे ग्रंथ स्वरूपात प्रकाशितदेखील केली जाणार आहेत. आजच्या काळामधील परिस्थितीला अनुसरून असणाऱ्या प्रामुख्याने धोरणात्मक पातळीवर राष्ट्रीय मुद्द्यांवरचे त्यांचे विचार होते त्याचेही डॉक्युमेंटेशन केले जाणार आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून ते सध्याच्या पंतप्रधानांपर्यंत तसेच सर्व राष्ट्रपती व पंतप्रधानांबरोबर राजकीय, सामाजिक पातळीवरील त्यांचे जे पत्रव्यवहार आहेत त्याचा राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा पत्रकारिता शिकणाऱ्यांसाठी अभ्यासासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यांच्या त्या निवडक पत्रांचे संकलन करून एक पुस्तक तयार करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर डॉ. धारिया यांचे जीवन चरित्र फोटोंच्या माध्यमातून उघडण्याचा सुद्धा प्रोजेक्ट आपण करत आहोत. फोटो बायोग्राफी स्वरूपामध्ये त्यांचे जीवन चरित्र आपण मांडणार आहोत.

Leave A Reply

Translate »