मतदानाची आकडेवारी बघता मुरलीधर मोहोळांच्या पथ्यावर पडणार वाढलेली मतदानाची टक्केवारी?

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान पार पाडले. पुण्यामध्ये 51 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार एकूण 53.54 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का सुमारे चार टक्यांनी वाढला आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नक्की कोणाला होणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभानिहाय झालेले मतदानाची आकडेवारी बघता प्रथमदर्शनी वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा भाजपला म्हणजेच मुरलीधर मोहोळ यांना होणार असल्याचे दिसते आहे.

कसबा विधानसभा मतदार संघामध्ये 59.24 टक्के मतदान झाले आहे. 2019 मध्ये झालेल्या एकूण मतदानापेक्षा केवळ 2600 मतांची वाढ या मतदार संघांमध्ये झाली आहे. या मतदार संघात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार झाले. तोच ‘धंगेकर पॅटर्न’ चालणार का? अशाही चर्चा झडत आहेत. परंतु, त्या पोटनिवडणुकीमध्ये ‘मोदी फॅक्टर’ नव्हता. शिवाय ब्राह्मण समाजाची नाराजी होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून लोकसभा निवडणुकीचा अंदाज बांधने चुकीचे ठरेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचाही परिणाम येथील मतदानावर नक्कीच झाला आहे.

वडगावशेरीमध्ये 2019 च्या तुलनेत 35 हजार 636 मतांची वाढ झालेली आहे. सहा विधानसभा मतदार संघामध्ये ही सर्वाधिक वाढ आहे. भाजपने लावलेली ताकद, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे आणि मुरलीधर मोहोळांचा या मतदार संघात असलेला नातेवाईकांचा गोतावळा यामुळे या वाढीचा अथवा मतदानाचा फायदा मोहोळ यांनाच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे.

कोथरूड हा तर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदार संघामध्ये 2019 च्या तुलनेत सुमारे 17 हजार मतांनी वाढ झाली आहे. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर लागलेली वर्णी ही मोहोळांच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. कुलकर्णी यांनी लावलेला जोर आणि राज ठाकरे यांच्या सभेचा या मतदार संघावरही परिणाम झाला आहे. त्याचा फायदा हा मोहोळांनाच होणार आहे.

पर्वतीमध्ये 2019 च्या तुलनेत 5 हजार 704 मतांची वाढ झाली आहे. मागीलवेळी या मतदारसंघातून स्व. गिरिष बापट यांना मताधिक्य होतंच. यावेळीही आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ यांनी वस्त्यांमध्ये लावलेला जोर, भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी लावलेली ताकद, पर्वती भागात ब्राह्मण मतदार आणि मोठ्या प्रमाणात असलेला व्यापारी वर्ग यामुळे या मतदार संघातही मोहोळ यांनाच त्याचा फायदा होणार आहे. शिवाय भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक याच विधानसभा मतदारसंघात असल्याने संघटनात्मक मोठी ताकद मोहोळांना मिळाली. तसेच राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनीही सक्रीयपणे सहभाग घेतला होता.

शिवाजीनगरमध्ये 2019 च्या तुलनेत 1 हजार मतांची घट झाली आहे. तर कॅन्टोन्मेंटमध्ये 9 हजार 700 मतांची वाढ झाली आहे. याठिकाणी भाजपचे आमदार आहेत. येथे समसमान मते जरी गृहीत धरले तरी एकूण वाढ ही मोहोळांना फायद्याची ठरणार असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Translate »