आहारात भरडधान्यांचा वापर वाढविण्याची गरज – बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

वनराईच्या भरडधान्य प्रदर्शन आणि स्नेहमिलनास उत्स्फुर्त प्रतिसाद..

पुणे – “ज्याच्यात चमक आहे, त्याच्यात धमक नाही” असे आजचे अन्न आहे, “जून ते सोनं” या म्हणीप्रमाणे भरडधान्य हेच पौष्टिक अन्न आहे. भरडधान्याविषयी सर्वकाही लोकांना माहिती नाही, आपल्या आहारात पूर्वी भरडधान्येच अधिक होती. आहारातून हळूहळू भरडधान्ये गायब होत गेली. त्याचे गंभीर परिणाम आज आपण भोगत आहोत. लोकांचे अनेक व्याधींनी शरीर ग्रस्त झाले असून पुन्हा आहारात भरडधान्यांचा वापर वाढविण्याची गरज आहे असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेचा ३७ वा वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. यानिमित्ताने आयोजित केलेल्या “भरडधान्य (मिलेट्स), आदिवासी लोकसंस्कृती” या निसर्गस्नेही प्रदर्शनाचे उद्घाटन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटन प्रसंगी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडिया, रोहिदास मोरे, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
बीजमाता राहीबाई म्हणाल्या की, आपल्या पारंपरिक धान्याचा खाण्यात अधिकाधिक वापर करून स्वतःचा फायदा करून घेतला पाहिजे. मी गावठी आणि हायब्रीड खाण्याचाही 

अनुभव स्वतः च्या घरापासून घेतला. रोजच्या आहारात कडधान्य, भाजीपाल्याबरोबरच भरडधान्य देखील सामील करून घेतले. मी जरी शाळा शिकले नाही तरी मला निसर्गाच्या शाळेने खूप काही शिकवले. काळ्या मातीशी नातं जोडलं, रोजच्या जगण्यातला निसर्ग लोकांसमोर मांडला. त्याबद्दल मिळालेला  

पद्मश्री पुरस्कार असो कि 

इतर अनेक पुरस्कार मी हे सर्व काळ्यामातीशी असलेल्या बांधिलकीची कमाई आहे असे राहीबाई म्हणाल्या.
या निसर्गस्नेही प्रदर्शनात बीजमाता राहीबाईंनी जोपासलेली पारंपरिक दुर्मिळ बी – बियाणे, विविध भरडधान्याचे प्रकार, भरडधान्यांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या लाह्या, पोहे, पापड, पास्ता, कुकीज, बिस्किटे, शेवया आदी अनेक पदार्थ, औषधी वनस्पती, दैनंदिन गृहपयोगी पर्यावरण पूरक उत्पादने, बांबूपासून तयार केलेली  उत्पादने, विविध कापडी बॅग्स, हस्तकलेतून साकारलेले शो पीस, बायोगॅस स्टो तसेच वनराई मासिक व संस्थेची प्रकाशने उपलब्ध होते. वनराईचा गेल्या ३७ वर्षातील प्रवास यानिमित्ताने नागरिकांना पाहता आला. पुण्यातील मित्रमंडळ चौक, पर्वती येथील वनराई संस्थेच्या आवारात हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

रवींद्र धारिया म्हणाले की, आपल्या पारंपरिक अन्नधान्याबद्दल तसेच आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी या प्रदर्शनाचे वनराईतर्फे आयोजन केले. वनराईच्या प्रमुख उद्दिष्ठांनमध्ये ग्रामीण विकासाचे काम अग्रस्थानी आहे. भारतभूमी हरित आवरणाने सदैव नटलेली असावी, इथली पडीक जमीन आणि रिकामे हात सदैव उत्पादनक्षम असावेत, स्वच्छ आणि सुंदर परिसर हा इथला प्रत्येकाचा श्वास असावा, इथले जलस्त्रोत शुध्द पाण्याने नेहमीच खळाळत असावेत, आधुनिक विज्ञान-तंत्राज्ञानयुक्त साधनांचा लाभ इथल्या समाजस्तरातील शेवटच्या घटकापर्यंत व्हावा हे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा अण्णा यांचे

 स्वप्न होते. कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं 

या हेतूने ‘स्नेहमिलन आणि पर्यावरण प्रदर्शनाचे’ दरवर्षी वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरणस्नेही प्रदर्शनातील विविध गोष्टीतून लोकजागृती करत असतो.
यावेळी पुण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली. याचबरोबर सामाजिक, राजकीय, कृषी, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण प्रदर्शन आणि स्नेहमेळाव्याला आवर्जून हजेरी लावली. पुणे, सातारा, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जालना अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील गावागावांतील कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वनराई कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती.

Leave A Reply

Translate »