सोलर प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद…

नागरिकांनी समजून घेतली सौर ऊर्जा उपकरणे…

पुणे:  – महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) च्या वतीने आयोजित “सोलर एक्स्पो २०२३”ला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून शनिवारी तब्बल १० हजारहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. सौर उर्जेवर चालणाऱ्या विविध उपकरणांसाठी उपलब्ध असलेल्या सबसिडी योजना आणि कर्जपुरवठ्यासाठी विविध बँकांचे स्टॉल्स व महावितरण अधिकारी, कर्मचारी याठिकाणी असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. प्रदर्शनामध्ये महावितरणतर्फे नागरिकांशी थेट संवाद साधत वीजसुरक्षेबाबत प्रबोधन केले जात आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाचे सहसचिव दिनेश जगदाळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगडपल्लेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मास्माचे अध्यक्ष रोहन उपासनी, सचिव स्वप्नील बाठे, अमित कुलकर्णी, शशिकांत वाकडे, संचालक समीर गांधी, अतुल होनोले, जयेश अकोले, प्रदीप कुलकर्णी, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, आशिष मुळे, मनिषा बारबिंड, नरेंद्र पवार, योगेश गोसावी, मयूर पांडे, अक्षय पांचाल उपस्थित होते.

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाचे सहसचिव दिनेश जगदाळे म्हणाले की, शासनातर्फे ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, मोठे सौर प्रकल्प उभारण्याबरोबरच जास्तीत जास्त घरांमध्ये सौर पॅनल लावण्यावरही आम्ही जोर देत आहोत. लोकांना अगदी सहजपणे घराच्या छतावर ‘रूफ टॉफ सोलर प्रोजक्ट’ लावता यावे, यासाठी एक नॅशनल पोर्टलदेखील सुरू करण्यात आले आहे. यामुळे घरामध्येच वीज निर्माण करणे आणि वीज उत्पादनातून उत्पन्न कमविणे, अशा दोन्ही बाजूंनी मदत होईल. आपले ऊर्जा क्षेत्र कार्यक्षम व्हावे, प्रभावी व्हावे आणि वीज सामान्य लोकांच्या आवाक्यातील असावी, यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने आवश्यक असणा-या सुधारणा करण्यात आल्या असल्याचे जगदाळे म्हणाले.

महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगडपल्लेवार म्हणाले की, सरकारचा भर वीज उत्पादन वाढविण्याबरोबरच वीजेची बचत करण्यावरही आहे. वीज वाचविणे म्हणजे भविष्य घडविणे आहे. पीएम कुसुम योजना याचे एक उत्तम उदाहरण आहे. आम्ही शेतकरी बांधवांना सौर पंपाची सुविधा देत आहोत. शेताच्या बांधावर सौर पॅनल लावण्यासाठी मदत केली जात आहे. यामुळे अन्नदाता हा ऊर्जादाताही बनत आहे. शेतक-यांच्या वीजेच्या खर्चात बचत होत असल्याबरोबर त्यांना उत्पन्नाचे एक अतिरिक्त साधनही मिळाले आहे. देशातल्या सामान्य नागरिकांचे विजेचे बिल कमी करण्यामध्ये उजाला योजनेने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, रुफटॉप सिस्टीम, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळत आहेत. दोन दिवसीय हे प्रदर्शन रविवार ९ जुलै पर्यंतच डिपी रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे असणार आहे. तब्बल ८६ हून अधिक सौर उर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तू पासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी उपकरणे आहेत. सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Translate »