सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा बुलंद आवाज गमावला

कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांच्या आठवणींना उजाळा; बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन

पुणे : कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांच्या रूपाने आपण सामान्य लोकांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारा बुलंद आवाज गमावला आहे. बँकिंग कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य लोकांसाठी ते एक मार्गदर्शक, आधारवड होते. त्यांच्या निधनाने बँकिंग व कामगार क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

बॅंक कर्मचारी चळवळीचे राष्ट्रीय नेते तथा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी अध्यक्ष, अन्नपूर्णा परिवारचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात एआयबीईए, एआयबीओए, एमएसबीईएफ, ग्रामीण बँक फेडरेशन, समता प्रतिष्ठान आणि अन्नपूर्णा परिवार यांच्या वतीने ही शोकसभा झाली.

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष वारे, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव कॉम. देविदासतुळजापूरकर, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त महाव्यवस्थापक व्ही. सी. जोशी, बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त महाव्यवस्थापक पी. डब्ल्यू. काळे, कामगार नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर, अन्नपूर्णा परिवाराच्या मेधा पुरव-सामंत, स्त्री चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लता भिसे, दीपक पाटील, वसंत पोंक्षे, धोपेश्वरकर यांची कन्या प्राची बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

सुभाष वारे म्हणाले, “कॉम्रेड सुरेश धोपेश्वरकर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची उत्तम जाण असणारे व्यक्तिमत्त्व होते. संपूर्ण आयुष्यात सामाजिक हिताचा त्यांनी विचार केला. प्रत्येक चळवळीत सक्रिय राहिले. त्यांचे आपल्यातून जाणे निश्चितच पोकळी निर्माण करणारे आहे. माञ त्यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांचे काम तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.”कॉम्रेड अजित अभ्यंकर म्हणाले, “धोपेश्वरकर यांच्या सांस्कृतिक, सामाजिक आयुष्याच्या जडणघडणीत सत्यशोधक विचारांची मशागत पक्की रुजली होती. सामाजिक परंपरेची परिभाषा स्वीकारत चळवळीचे कार्य जोमाने सुरू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. बँकिंग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने असताना सामान्य माणसांच्या न्यायासाठी लढणारे ते नेते होते.”

देविदास तुळजापूरकर म्हणाले, “बँकिंग कर्मचाऱ्यांच्या चळवळीत धोपेश्वरकर यांचे योगदान मोठे आहे. या चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. सर्वसामान्य माणूस, कामगार आणि महिलांचा विकास केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला. त्यावर काम केले. कर्मचाऱ्यांच्या किंवा कामगारांच्या चळवळींचे नेतृत्व कसे असावे, याचा ते आदर्श वस्तुपाठ होते.”

प्राची बापट धोपेश्वरकर म्हणाल्या, सर्वांशी सहजतेचा, आपुलकीचा संवाद ठेवण्याची शिकवण बाबांनी दिली. त्यांची मुलगी या नात्याने मला त्यांचा भरपूर सहवास लाभला. कित्येकांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तीमत्वाची मुलगी असणे हे माझ्यासाठी खरोखरच भाग्य आहे. त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकता आल्या. त्यांचे लोक हिताचे कार्य कायम उर्जा देत राहते.”

मेधा पुरव-सामंत म्हणाल्या, “माझ्यासाठी मार्गदर्शक असलेले काका गेल्याचे दुःख आहे. परंतु, त्यांनी दिलेली शिकवण, विचार आणि सामान्यांना ताकदीने उभा करण्याचा वारसा आपल्याला पुढे न्यावा लागेल. अन्नपूर्णा परिवार घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.”

व्ही. सी. जोशी, पी. डब्ल्यू. काळे, लता भिसे, दीपक पाटील, वसंत पोंक्षे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी धोपेश्वरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पुणे बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष राणे व महासचिव शैलेश टिळेकर यांनी संयोजन केले.

Leave A Reply

Translate »