पंजाबसह सर्व राज्यातील अल्पसंख्याक समाज मोदींसमवेत

इक्बाल सिंह लालपुरा यांचे मत; अल्पसंख्याक आयोगाच्या राष्ट्रीय सल्लागारपदी अली दारूवाला यांची नियुक्ती

इमामवाडा मध्ये अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांच्या उपस्थितीत रोजा इफ्तार व संवाद कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : “भारतात अल्पसंख्याकांची प्रगती होत आहे. जगाच्या तुलनेत भारतात भेदभावाच्या घटना नगण्य आहेत. अशा घटना घडल्या, तर आयोग त्याची तातडीने दखल घेते. राजकारणापेक्षा समाजाची सेवा करण्यावर भर द्यावा, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे. त्यामुळे पंजाबसह सर्व राज्यात अल्पसंख्याक समाज मोदींसमवेत आहे,” असे मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अली दारूवाला यांच्या संकल्पनेतून इक्बाल सिंह लालपुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे कॅम्पमधील इमामवाडा येथे ‘रोजा इफ्तार’ आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुस्लिम व ज्यू समाज बांधवांनी एकत्रित रोजा इफ्तार करुन उपवास सोडला. 

यामध्ये मुस्लिम, ज्यू, पारसी, इराणी आणि ख्रिश्चन समाजातील अनेक लोकांची उपस्थिती होती. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या राष्ट्रीय सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती केल्याचे पत्र लालपुरा यांनी दारूवाला यांना दिले. यावेळी ‘मिलेट अँड वॉटर वुमन ऑफ इंडिया’ शर्मिला ओसवाल, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, भाजपचे राज्य प्रवक्ते अली दारुवाला,  सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर, चरणजीत सिंह साहनी, मौलाना झैदी, नितीन सोनटक्के, अजय खेडेकर, दीपक नागपुरे यांच्यासह अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लालपुरा म्हणाले, “अल्पसंख्याक समुदायाची प्रगती हीच देशाची प्रगती आहे. पुण्यात अल्पसंख्याक विविध समुदायाच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमुळे त्यांना प्रगती साधण्याचा विश्वास मिळत आहे, असेच या सर्वांनी सांगितले. पंतप्रधानांच्या धोरणानुसार आम्ही कार्यरत आहोत. भारत वेगाने प्रगती करीत आहे. जग या प्रगतीची दखल घेत आहे. भाजपा क्रमांक एकचा पक्ष असून, या पक्षात अल्पसंख्याकांना यावेसे वाटते. तेव्हा त्यांचे स्वागत करायला हवे.”

राजेश पांडे म्हणाले, “सर्वांचा विश्वास मिळवून सर्वांना प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यरत आहोत. पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत आहे. अफवा, चुकीच्या चर्चांवर विश्वास न ठेवता पक्षावर विश्वास ठेवावा व देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे.”

त्याआधी दिवसभरात इक्बाल सिंह लालपुरा यांनी डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. परवेझ ग्रँट, फिरोज पदमजी, सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर यांच्यासह अल्पसंख्य समुदायातील अनेक मान्यवरांची भेट घेतली. सरकारी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली.

Leave A Reply

Translate »