पारंपरिक औषधांचे आणि वनौषधींचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

शाश्वत भविष्यासाठी ‘वनौषधी’ ही काळाची गरज – भरणे

पुणे, ‘कोविड-१९’ या जागतिक महामारीमुळे पारंपरिक औषधांचे आणि वनौषधींचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शाश्वत भविष्यासाठी ‘वनौषधी’ ही काळाची गरज असल्याचे आधुनिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. निसर्गतः भारतीय वनांमध्ये औषधी वनसंपदा विपुल प्रमाणात आढळते. वन क्षेत्रातील दुर्मीळ औषधी वनस्पतींचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे असल्याने शेताच्या बांधांवर, कोरडवाहू शेतीमध्ये, तसेच पडीक, डोंगराळ व मुरमाड शेतजमिनीवर औषधी वनस्पतीची लागवड केल्यास अतिरिक्त जमीन हरित आच्छादनाखाली येऊ शकेल. ज्यातून मृदा-जल संधारण, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संतुलनाला हातभार लागेलच. शिवाय आदिवासी व शेतकरी कुटुंबांना उपजीविकेच्या नव्या संधीही प्राप्त होतील. भविष्यात वनराई आणि वन विभागामार्फत राज्यातील वन संवर्धन, पर्यावरण तसेच विविध लोकपयोगी कामे करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.


वनौषधी: शाश्वत भविष्यासाठी… या विषयावरील “वनराई वार्षिक विशेषांक” प्रकाशन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाइकडे, डॉ. दिगंबर मोकाट, सीएसआर प्रमुख सीमा पावसकर, जयवंत देशमुख, नगरसेवक आबा बागुल, सतिश देसाई उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘आयुष आपके द्वार’ या मोहीमेअंतर्गत नागरिकांना वनौषधी रोपांचे निशुल्क वाटप झाले.


वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, लोकशिक्षण, प्रबोधन व जनजागृती घडवून आणण्यासाठी ‘वनराई’च्या वतीने गेल्या तीन दशकांपासून ‘वनराई’ मासिक प्रकाशित केले जात आहे. राज्यामध्ये वनौषधींची लागवड, त्यावरील संशोधन, प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग, प्रचार-प्रसार आणि या वनौषधींचा प्रत्यक्ष वापर वाढवण्याला मोठ्या प्रमाणात वाव आहे. ज्यामुळे आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा तुटवडा असणाऱ्या दुर्गम, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकेल आणि ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास हातभार लागू शकेल. गुणवत्तापूर्ण वनौषधींचा तुटवडा, औषधी वनस्पतींच्या नावाने होणारी भेसळ आणि सर्व स्तरांमध्ये शास्त्रीय ज्ञानाचा व माहितीचा असणारा अभाव अशी अनेक आव्हाने या क्षेत्राला भेडसावत आहेत. म्हणूनच या विषयावर तज्ज्ञांचे  विचारमंथन घडवून आणण्याबरोबरच, या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याकरिता ‘वनौषधी: शाश्वत भविष्यासाठी…’ हा विशेषांक प्रकाशित करत आहोत.


अमित वाडेकर म्हणाले, ‘आयुष पॅथीं’चे म्हणजेच आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांचे महत्त्व कोरोना काळात सर्व समाजघटकांना नव्याने उमजले आहे. त्यामुळे आयुष पॅथी’ अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींची उपयुक्तताही पुन्हा एकदा चर्चाविश्वात आली आहे. आपल्याकडे जास्त जमीनधारणा असलेले, बागायतदार, अल्पभूधारक, कोरडवाहू, भूमिहीन अशी शेतकऱ्यांची मोठी वर्गवारी आहे तसेच घराच्या अंगणात, परसबागेत, इमारतींच्या छतांवर किंवा बाल्कन्यांमध्ये लागवड करू इच्छिणारे जसे वृक्षप्रेमी आहेत. तसेच सार्वजनिक जागांवर औषधीवन’ उभारू पाहणाऱ्या स्वयंसेवी संस्था- संघटनाही आहेत. या सर्वांना उपलब्ध जागेनुसार लागवड करण्याच्या दृष्टीने वनस्पतीनिहाय सर्वांगीण माहिती मिळावी, म्हणून या अंकातून वृक्षवर्गीय वनौषधी, झुडूपवर्गीय वनौषधी, वेलवर्गीय वनौषधी, गवतवर्गीय वनौषधी व कंदवर्गीय वनौषधी या पाच विभागांमध्ये निवडक वनस्पतींची माहिती देण्याचाही प्रयत्न केला आहे.

डॉ. दिगंबर मोकाट म्हणाले की, दुर्मीळ वनौषधींच्या वारशाचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच, त्यांचे लोकसहभागातून जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने कायद्याचे कवच असणारी लोकाभिमुख व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि उपयुक्त वनौषधींची व्यावसायिक तत्त्वावर पुनर्लागवड करावी लागेल. याव्यतिरिक्त विविध भाषांमधील प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या निरनिराळ्या वनस्पती ओळखणे, त्यांची उपयुक्तता प्रयोगशाळेत पडताळून वनौषधींचे निश्चितीकरण करणे व त्या वनौषधीसुद्धा लागवडीखाली व उपयोगात आणणे आवश्यक आहे. याचप्रमाणे ग्रामीण, आदिवासी, वैदू व वैद्यकांनी मौखिक परंपरेतून जोपासलेल्या पिढीजात लोकज्ञानाचे संशोधन व दस्तऐवजीकरण करणेदेखील गरजेचे आहे.

फोटो ओळ- वनौषधी: शाश्वत भविष्यासाठी.. प्रकाशनप्रसंगी डावीकडून डॉ. दिगंबर मोकाट, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाइकडे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर

Leave A Reply

Translate »