“मधु-स्मृती” या शास्रीय संगीत समारोहाचे उद्घाटनशास्त्रीय गायनातील प्रयोगांचे नेहमीच स्वागत-  डॉ. विकास कशाळकर, ज्येष्ठ गायक

पुणेः- शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात गुरू परंपरा आहे, परंतु शिष्याने गायनाची तीच गुरू परंपरा पुढे चालू ठेवावी, असे अपेक्षित नसून शिष्याने त्याच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून गायनात प्रयोगशीलता आणणे अपेक्षित आहे. अशा अनेक प्रयोगांचे रसिकांकडून स्वागतच झाले आहे, अशी इतिहासात नोंद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर यांनी केले. 

शास्त्रीय संगीताच्या दैदिप्यमान परंपरेला समृद्ध करून रसिक श्रोत्यांची अभिजात संगीताप्रती आस्था वाढावी या प्रमुख उद्देशाने स्व. मधुकर खांडवे आणि स्व. मधुकर हस्तक या संगीत प्रेमी रसिकांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आयोजित  “मधु-स्मृती” या शास्रीय संगीत समारोहाचे उदघाटन ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.  एस. एम. जोशी सभागृहात आयोजित या समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर संगीत शिक्षणाला समर्पित ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. विद्या खांडवे, मोहन खांडवे, रसिकराज रवींद्र दुर्वे, तरुण पिढीचे आघाडीचे गायक कलाकार आदित्य खांडवे, गायक अतुल खांडेकर आणि गायिका भारती प्रताप आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना डॉ. विकास कशाळकर म्हणाले की, शास्त्रीय गायनात विविध प्रयोग करणारे पंडित जसराज हे अतिशय मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी त्यांचे मेवती घराणे आत्मविश्वासाने वाढवले आणि त्याची गायकी घराघरात पोहोचवली. उच्चकोटींच्या गुरूंकडून गायनाचे प्रशिक्षण घेऊन कलाकार त्यात जेव्हा नाविण्यता आणत सप्रयोग सादरीकरण करतो, तेव्हा तो नवअनुभव असतो. 

यावेळी रसिकराज रवींद्र दुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विद्या खांडवे  यांनी केले.  मोहन खांडवे यांनी स्वागत केले, तर सूत्रसंचालन आदित्य खांडवे यांनी केले. उदघाटन सोहळ्यानंतर झालेल्या “मधु-स्मृती” या विनामूल्य शास्रीय संगीत समारोहात ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका संगीत महामहोपाध्याय डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर आणि आग्रा-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका श्रीमती ललिता राव यांच्या शिष्या भारती प्रताप यांनी विविधांगी शास्त्रीय गायन सादर केले.  अतुल खांडेकर यांनी सर्वप्रथम राग गावतीमध्ये  ‘मोरे नंदलाल’ ही विलंबित एकताल मधील रचना सादर करून मैफलीचा सुरेल प्रारंभ केला. यानंतर त्यांनी सादर केलेली ‘अंगिया न डारो रे गुलाल’ ही मध्यलय अध्धा त्रिताल मधील रचना रसिकांची दाद घेऊन गेली. यानंतर द्रुत त्रिताल मधील पं. बलवंतराय भट्ट यांनी बांधलेला तराणा तर त्यांच्या सादरीकरणाचा परमोच्च बिंदू ठरला. पटदीप रागातील मध्यलय आडा चौताल मधील तराणा आणि संगीत सन्यस्त खड्गमधील  ‘मर्म बंधातली ठेव ही’ हे नाट्यपद खरोखरच रसिकांच्या मनामध्ये मर्मबंधातील ठेव ठेवून गेले. तडफदार पण मुलायम आवाज, रागाची मुद्देसुद मांडणी आणि दाणेदार तान या प्रमुख वैशिष्ट्यांव्दारे अतुल खांडेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. 

यानंतर घराणेदार तालीम आणि रागाचे लालित्यपूर्ण सादरीकरण याची प्रचिती अगदी प्रारंभापासूनच देत भारती प्रताप यांनी बिहाग रागातील विलंबित एक तालात ‘कैसे समझाऊं सखी री’ ही तसदुक हुसैन खान यांची रचना प्रथम सादर केली. ‘कान्हा भर भर मारे पिचकारी’ ही दृत तीन तालात त्यांनी सादर केलेली रचना रसिकांना व्दारकेतील कृष्णलीलांची अनुभुती देऊन गेली. यानंतर भारती प्रताप यांनी गुरू उस्ताद खादीम हुसेन खान यांनी बांधलेली बागेश्री रागातील ‘नोम तोम’ ही रचना सादर करून गुरूंना अभिवादन केले. या रचनेतून आपल्या आग्रा-अत्रौली घराण्याची खासियत  उलगडून दाखवत त्यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली.

या गायक कलाकारंना तबल्यावर प्रशांत पांडव आणि अजिंक्य जोशी यांनी तर संवादिनीवर लीलाधर चक्रदेव आणि मिलिंद कुलकर्णी यांनी साथसंगत केली. छायाचित्र ओळीः-  स्व. मधुकर खांडवे आणि स्व. मधुकर हस्तक या संगीत प्रेमी रसिकांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आयोजित  “मधु-स्मृती” या शास्रीय संगीत समारोहाचे उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर. यावेळी व्यासपीठावर डॉ. विद्या खांडवे, मोहन खांडवे, रसिकराज रवींद्र दुर्वे, आदित्य खांडवे, अतुल खांडेकर आणि भारती प्रताप आदी मान्यवर उपस्थित होते. 

Leave A Reply

Translate »