स्वास्थ्यम’मध्ये उलगडले शारीरिक व मानसिक आरोग्याचे रहस्य

पुणे- शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी जीवन जगण्याबद्दलचा आपला समग्र दृष्टिकोन कसा असावा,जीवनात आनंदी राहण्याची कला आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हास्य हे सर्वोत्तम औषध कसे आहे याचे विविध पैलू विविध ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने आयोजित ‘स्वास्थ्यम’ या कार्यक्रमात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात तज्ज्ञ, व्याख्याते यांनी उलगडले.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘वुई आर इन धिस टुगेदर’ या मोहिमेद्वारे आयोजित ‘स्वास्थ्यम्’ या कार्यक्रमांतर्गत रविवारी प्रसिद्ध योगगुरु डॉ. हंसाजी योगेंद्र, अध्यात्म गुरु प्रभू गौरांग दास यांनी प्रत्येक व्यक्तीला रोजच्या जगण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. तर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांनी आनंदी जीवनासाठी हास्य किती महत्वाचे आहे याचे महत्व विशद केले. सकाळ समूहाच्या संचालिका आणि वुई आर इन धिस टुगेदर (WAITT) मोहिमच्या संस्थापिका सौ. मृणाल पवार आणि दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी या मान्यवरांचे स्वागत केले.

एकात्म मन-शरीरातून सकारात्मक दृष्टीकोनाची मशागत करणे आणि अशा दृष्टीकोनाचा समाज निर्माण करणे, हा स्वास्थ्यम् उपक्रमाचा हेतू आहे. अशा समाजात लोक दुःख आणि वेदनांपासून मुक्त असे आनंदी आयुष्य जगू शकतील. या समाजाच्या निर्मितीचा प्रवास आत्मभान, उत्सुकता आणि स्वतः व इतरांविषयी करूणेतून सुरू होतो. स्वास्थ्यम् उपक्रमातून हा संदेश आम्ही देऊ इच्छितो, असे सौ. मृणाल पवार यांनी यावेळी नमूद केले.

योगगुरु डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी शरीर,मन आत्मा, आयू आणि भोग या मानवी जीवनातील संकल्पना उलगडून सांगताना या गोष्टींचा समतोल राखण्यासाठी योगाचे महत्व प्रात्यक्षिकासह विषद केले.

प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे आहे. लहानपणापासून कुठल्या वातावरणात आपली वाढ झाली, जीवनपद्धती काय आहे, लाहानपणापासून आलेले अनुभव हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असतात. त्यामुळे दुसऱ्याला बरोबर वाटणारी एखादी गोष्ट आपल्याला चुकीची वाटू शकते आणि त्यातून तणाव निर्माण होतो व तो शरीराच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो हे त्यांनी सांगितले. ज्ञानामुळे माणूस सर्व समस्यांपासून दूर राहू शकतो. काय केल्याने आपण काय टाळू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला तर माणूस सुखी होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी देवाशी संवाद साधला. तसा संवाद प्रत्येक माणूस साधू शकतो. आपण स्वत:ला ईश्वराप्रती समर्पित केले तर आपले स्वास्थ्य चांगले राहू शकते असेही त्यांनी नमूद केले. स्वत:वर प्रेम करा, जगापासून स्वत:चा बचाव करा, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे राग आला तर रागाच्या भरात कुठलीही कृती करू नका. योगाद्वारे रागावर नियंत्रण मिळवा असे त्यांनी सांगितले. आनंदी आणि सूखी जीवनासाठी आहार आणि निद्रेचे महत्व काय आहे हे सांगतानाच आहार कधी आणि कसा घ्यावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

अपेक्षेच्या विपरीत घडले तरी ते स्वीकारण्याची तयारी हवी – प्रभू गौरांग दास

प्रभू गौरांग दास म्हणाले, जीवनात सुख प्राप्त करायचे असेल तर मन, इंद्रिये, सवयी व दिनचर्या यांचे व्यवस्थापन करण्याची कला अवगत करण्याची आवश्यकता आहे. अपेक्षा,सफलता, तुलना, स्वप्रशंसा,तत्व आणि सहनशीलता या संकल्पनांच्या माध्यमातून प्रत्येकजण आनंदी जीवन कसे जगू शकतो यांचे सविस्तर विवेचन त्यांनी केले.

भगवतगीतेनुसार, वास्तविकता अपेक्षेनुसार चालली नाही तर तणाव निर्माण होतो ही तणावाची व्याख्या आहे. त्यामुळे आपल्या अपेक्षेच्या विपरीत काही घडले तर ती स्वीकारण्याची मनाची तयारी पाहिजे, आपल्या अपेक्षा लवचिक असल्या पाहिजेत, उतार- चढाव हे जीवनातले सत्य आहे असे त्यांनी सांगितले.

आपल्याकडे जी क्षमता आहे त्याची प्रशंसा आपण करतो का? असा सवाल त्यांनी श्रोत्यांना केला. भारत विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये महत्वाचा पैलू आपल्याकडील ‘परिवार’ ही संकल्पना आहे असे त्यांनी सांगितले.

हसणे करते तणावमुक्त -रितेश देशमुख

मानवी जीवनात कुठलेही नाते असू द्या. मग ते प्रियकर-प्रेयसीमधले असेल. दोन मित्रांमधले असेल, भावा- बहीणींमधले असेल, आई- मुलांमधील असेल त्यामध्ये मानवी संबंध हा महत्वाचा भाग आहे. या कुठल्याही नात्यामध्ये मतभेद असतात. मात्र, ते एकत्र येणासाठी हसणे महत्वाचे असते असे अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने सांगितले.

‘स्वास्थ्यम’ या कार्यक्रमात रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांची मुलाखत घेण्यात आली. तसेच रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे लोकांच्या मनात घर करणारा अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. कायमच तो त्याची बायको जेनेलियासोबत फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण तणावात होते. त्यातून ही मजेशीर व्हिडीओची कल्पना सुचली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असे त्याने सांगितले.

‘वेड’ या आपल्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबाबत बोलताना रितेश म्हणाला, हा चित्रपट, ‘लव्ह ट्रॅंगल’ नाही तर दोन ‘लव्ह स्टोरी’ आहेत. वेडेपण नसेल तर जगण्यात मजा नाही. ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही. आपण सर्व जिवंत आहोत परंतु वेडेपणा आपल्याला जिवंत ठेवतो. प्रेमामध्ये जेव्हा स्वत:ला समर्पित करावे लागते तेव्हा ते स्रीच करू शकते. पुरुषांमध्ये ते होत नाही. कोणत्याही अटीवीना प्रेम या स्रीयाच करू शकतात.तोच ‘वेड’ या चित्रपटाचा गाभा आहे आहे असे त्याने सांगितले.

लग्नाअगोदरच्या रितेशबरोबरच्या 10 वर्षे मैत्रीच्या नात्याबद्दल सांगताना जेनेलिया म्हणाली, आम्ही अमुक वर्षी लग्न करायचे असे काही ठरवले नव्हते. तुझ्या करिअरकडे तू लक्ष दे असे मला रितेशने सांगितले होते. लगेच लग्न करण्यापेक्षा जीवनात आनंद घ्यायचा हे आम्ही दोघांनी ठरविले होते असे तीने सांगितले.

तुला रितेश पती, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता की मुलांचे वडील म्हणून जास्त आवडतो असे विचारले असता रितेश हा “ऑल इन वन’ आहे असे उत्तर जेनेलियाने दिले.

आहार तज्ञ नुपूर पाटील म्हणाल्या, आरोग्य हे प्रत्येकाच्या हातात असते. भोजन, निद्रा आणि योगासने यांचे योग्य संतुलन ठेवल्यास जीवन सुखमय होते .तसेच रोजच्या जेवणात साखरेचे प्रमाण कमी ठेवावे.
जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तंदुरुस्त राहण्याबरोबरच चालत फिरत राहावे यासाठी योग्य आहाराची गरज आहे. भारतीय आहार पद्धतीत प्रोटीनचे प्रमाण कमी प्रमाणात आढळतात. त्यामुळे पालेभाज्या, कंदमुळे पोळी , भाकरी, भाजी आणि सर्व डाळी यांचे योग्य संतुलन असावे. त्यालाच बॅलन्स डाएट (संतुलित आहार)असे म्हणतात.
जीवनशैली योग्य ठेवण्यासाठी आधुनिक खाद्यपदार्थावर संपूर्णपणे बंदी घालावी असेही त्यांनी सांगितले.

श्री एम. यांनी मनाचा विस्तार कसा करावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले.मनाला ठीक करणे म्हणजे योग आहे. साधना ही आत्म परिवर्तन करते. मानवाच्या परिस्थिती नुसार साधना वेगवेगळी असते.
पतंजली ने आठ सूत्रे सांगितली आहेत. त्यात यम, आसन, प्राणायाम यांचा समावेश आहे. यात यम सूत्रात अहिंसा महत्वाची आहे.तसेच आसन सूत्र शरीर व मना साठी उत्तम आहे.
सतत धारण ही पुढे ध्याना मध्ये परिवर्तन होते.
योगाचे कार्य म्हणजे पूर्णतः होणे. समाधी म्हणजे मन शांत होणे.
आजच्या काळात विद्यार्थ्यांना मनाचे ज्ञान देणे गरजेचे आहे. माणसाच्या मनामध्ये अद्वितीय क्षमता लपलेली असते, त्यासाठी ध्यान गरजेचे आहे.

यावेळी अभिजीत पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री एम म्हणाले
जीवनामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला योग्य गुरू मिळतो. गुरु चा आदर करण्याबरोबरच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे.
साधनेमुळे बाह्य गोष्टी न पाहता सर्वांवर प्रेम करण्याची शक्ती मिळते. आत्मप्रेम हे सर्वात महत्त्वाचे आहे
कलियुगात मंथन सुरू आहे यात सुरुवातीला विष बाहेर निघेल त्यानंतर अमृत बाहेर येईल
साधनेमुळे बाह्य गोष्टी न पाहता सर्वांवर प्रेम करण्याची शक्ती मिळते. आत्मप्रेम हे सर्वात महत्त्वाचे आहे. असेही त्यानी सांगितले.
आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश देशपांडे व वंसुंधर यांनी केले.

Leave A Reply

Translate »