‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे ‘राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार २०२२’ प्रदान 

पुणे : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले. डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात डिजीटल मीडिया संपादक पत्रकारांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. शंभूराज देसाई, दीपक केसरकर यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, सातारा जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “बदलत्या काळात डिजिटल पत्रकारिता महत्वाची भूमिका निभावत आहे, हे आम्ही शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करताना पाहत आहोत. पत्रकारितेतील महत्वाच्या संपादकांच्या संघटनेकडून सूर्यदत्त संस्थेचा झालेला सन्मान उत्साह वाढवणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे, रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही कायम सुरु राहील. हा पुरस्कार संस्थेशी संबंधित सर्व घटकांना समर्पित करतो. ‘सूर्यदत्त’मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित मीडिया अँड कम्युनिकेशन्समधील बीएजेएम, एमएजेएम, एमएस्सी यासह इव्हेन्ट मॅनेजमेंट असे अभ्यासक्रम शिकवले जात असून, गेल्या २० वर्षात १००० पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिकून आज नामवंत माध्यम संस्था, प्रॉडक्शन, रेडियो, टीव्हीमध्ये कार्यरत आहेत. डिजिटल मीडियामध्येही अनेकजण काम करत आहेत.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, “समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढे अशा पद्धतीचे काम माध्यमांनी करावे. पत्रकारांना आरोग्य, मुलांना शिक्षण तसेच राहण्यासाठी घरे याबरोबर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

शंभूराज देसाई म्हणाले, “संघटनेने स्थानिक स्तरावर नियमावली तयार करुन द्यावी. त्याआधारे त्यांना अधिकृत म्हणून ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही करता येईल. टेंभू ता. कराड येथील गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक करण्याच्या पत्रकारांच्या मागणीचा विचार करुन ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केला जाईल.”

दीपक केसरकर म्हणाले, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजीटल पत्रकारिता ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहेत. माध्यमाची पोहोच आणि गतीमानता ही बलस्थाने लक्षात घेवून डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकशाही मुल्यांच्या जपणुकीसाठी माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण आहे.”

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, “पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. आजची पत्रकारिता बदलली असून त्याला आधुनिकतेची जोड मिळत आहे. पत्रकारांनी सत्याला वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी.” राजा माने यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद करुन डिजिटल माध्यमाचे महत्व सांगितले.

Leave A Reply

Translate »