उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्यपूर्ण, व्यावसायिक शिक्षणावर भर

संस्था, शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक करू नये

दीपक केसरकर यांचे प्रतिपादन; आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुलचा २२ वा वर्धापनदिन व वार्षिक स्नेहसंमेलन

पुणे : “शिक्षण पंढरी असलेल्या पुण्याने ज्ञानाची गंगा वाहती ठेवली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची बीजे पुण्यातून रुजली आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्यपूर्ण व व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. तसेच मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानाधारित शिक्षण सहजपणे घेता येईल,” असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचालित आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुलच्या २२ व्या वर्धापनदिन व ‘नवरस २०२२’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात दीपक केसरकर बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ‘नवरस २०२२’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री पद्मावतीमाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आळंदी येथील १५ अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले व महाराष्ट्र राज्य अपंग संस्थेचे अध्यक्ष समाजप्रबोधनकार लक्ष्मणराव पाटील यांच्या संस्थेतील अपंग विदयार्थ्याना आर्थिक सहकार्य देण्यात आले.

बाणेर येथील बंटारा भवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, प्रशासकीय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण, सारंग कोडोलकर, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, संध्या गायकवाड, श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल उर्फ नाना धनकुडे, अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सचिव विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. अविनाश ताकवले, सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे आदी उपस्थित होते.

दीपक केसरकर म्हणाले, “इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे पालकांना आकर्षण असले, तरी आपला पाल्य चांगला शिकला पाहिजे, ही त्यामागची भुमिका महत्वाची आहे. शिवाजी महाराज-फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांनी घ्यायला हवी. रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अशा नव्या तंत्रज्ञानाशी आपण गट्टी केली पाहिजे. भारतीय मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. आज खेड्यापाड्यात, वाडी वस्तीवर मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्याचा शिक्षण विभाग, अधिकारी-कर्मचारी व शिक्षक मेहनत घेत आहेत. येत्या १० वर्षात भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश असल्याने कौशल्य युक्त मनुष्यबळ निर्मिण्याचा प्रयत्न सुरू आहेत.”

——————————–

धनकुडे यांच्या कार्याचे कौतुक

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात शिवलाल धनकुडे यांनी केलेले काम भरीव स्वरूपाचे आहे. दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला आदर्श मानून अनाथांच्या भल्यासाठी धनकुडे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. शेकडो मुलामुलींना दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च, लग्न करून देण्याचे काम समाजहिताचे आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो, अशा शब्दांत केसरकर यांनी धनकुडे यांच्या कार्याचे कौतुक केले.

——————————-

…तर वेगळा विचार करावा लागेल

कोरोना काळात सर्वांचीच परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे अनेक पालक शैक्षणिक शुल्क भरू शकले नाहीत. हे शुल्क बुडवण्याचा त्यांचा उद्देश नसतो. तेव्हा शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. पुढील शिक्षणासाठी त्यांना अडचणीला सामोरे जावे लागु नये, ही खबरदारी घ्यावी. आगाऊ स्वरूपात धनादेश घेऊन या विद्यार्थ्यांचे दाखले व निकाल द्यावेत. विद्यार्थी, पालकांची अडवणूक करणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या विरोधात वेगळा विचार करावा लागेल. वेळप्रसंगी कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ, असे केसरकर यांनी सूचित केले.

——————————–
सर्वांगीण विकासाला प्राधान्य

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसा होईल, यावर भर द्यायला हवा. शिक्षण खात्यासह संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी एकत्रितपणे यावर मेहनत घ्यावी. शिक्षकांना अनेक सवलती देण्याचा विचार आहे. शिक्षण क्षेत्राला काहीही कमी पडू दिले जाणार नाही. उद्योग क्षेत्राला पूरक अशी शिक्षण व्यवस्था उभारण्यावर भर दिला जात आहे. तसेच सर्वोत्कृष्ट ज्ञान, चांगले संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षणही गरजेचे आहे, असेही केसरकर यांनी नमुद केले.

——————————–

पुस्तकासोबत वह्या मोफत देणार

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वह्या घेणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून पुस्तकासोबत वह्या देखील शासनामार्फत मोफत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पुस्तकात प्रत्येक पानासोबत एक कोरे पान दिले जाईल. ज्यावर विद्यार्थ्याला सराव करता येऊ शकेल व अतिरिक्त वही नेण्याची गरज भासणार नाही, असे केसरकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »