समाजभान जपणार्‍या उत्सव मित्र मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे: पूरग्रस्तांना मदत, वंचितांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक आधार, शेतकऱ्यांपासून दुबळ्यापर्यंत सगळ्यांनाच शक्य तितकी मदत करणारे नवी पेठ गांजवे चौकातील उत्सव मित्र मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. वर्षभर सामाजिक भान जपण्याचा या मंडळाचा प्रयत्न असून, यंदा अनेक विधायक कामे हाती घेतली आहेत. नवी पेठेतील खिलारे वाड्यात मंडळाची सुरुवात १९७२मध्ये झाली. यंदा या वर्षी मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने सामाजिक बांधिलकी राखून आळंदी येथील “स्नेहवन सामाजिक संस्था” चालवणारे अशोक देशमाने यांना सन्मानित करून आर्थिक साह्य करण्याचे ठरवले आहे. हा उपक्रम कॉसमॉस कॉ. ओ.बँकचे अध्यक्ष मिलिंद काळे व विश्वस्त-उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे पुनीत बालन यांच्या हस्ते करण्याचे ठरवले आहे.

खिलारेंच्या वाड्यात राहणाऱ्या नागरिकांसह नवी पेठेतील आजूबाजूची मंडळी गणेशोत्सवासाठी एकत्र यायची. त्यातूनच हे मंडळ मोठे होत गेले. सध्या या मंडळाची जबाबदारी मंडळाचे अध्यक्ष अतुल धर्मे यांच्यावर असून, ‘पीएमपी’चे माजी अध्यक्ष सुधीर काळे कार्याध्यक्ष आहेत. तसेच अजित काळे, विजय लोणकर, विनय कदम, सुनील वाबळे,सचिन गायकवाड, धनंजय लोणकर, सुनील पाटील आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव सुरळीतपणे चालू ठेवला आहे.

मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये वंचितांसाठी काम केलेली आर्थिक मदत असेल किंवा पूरग्रस्तांना अनाथ मुलांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या राहण्यासाठी देऊ केलेली आर्थिक मदत असेल, उत्सव मित्र मंडळ दर वर्षी जमेल ती रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी देते.करोनाच्या काळामध्ये मंडळाने जीवनावश्यक वस्तूंची तीन हजारांहून अधिक किट वाटली. नवी पेठेतील नागरिकांना करोनाच्या काळात विविध प्रकारची मदत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणे, हे मंडळाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘स्त्री जन्माचे स्वागत’ हा देखावा, ‘डोक्याला शॉट नको’ हा जडलेली व्यसने आणि मोबाइल इंटरनेटच्या रूपात नव्याने जन्माला आलेले ‘ई-व्यसन’ कमी करण्यासाठी देण्यात आलेला सामाजिक संदेश हा देखावाही शहरात चर्चेचा विषय ठरला होता. यंदा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य’ या संकल्पनेवर आधारलेला ‘जागर स्वराज्याचा हा देखावा साकारला आहे. सामाजिक देखाव्यांचे सादरीकरण आणि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, यामुळे उत्सव मित्र मंडळ केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादित नसून, ते वर्षभर चालणारे अधिष्ठान आहे, अशी मंडळाच्या कार्यकत्यांची भावना आहे.

Leave A Reply

Translate »