‘समायरा’ अनन्यसाधारण प्रवासाची कथा

पुणे : प्रश्नांच्या चक्रव्यूहात सापडलेली, आई-वडिलांच्या शोधात निघालेली ‘समायरा’ कशी स्वतःच स्वतःला उलगडते आणि तिच्या आयुष्यातील काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे हळूहळू तिच्यासमोर येते, अशा अनोख्या प्रवासाची ही कहाणी आहे. हा चित्रपट आजच्या पिढीला अध्यात्माचे महत्व सांगणारा ठरेल. या प्रवासात तिला भेटलेला तिचा साथीदार आणि त्यांचे हळू हळू फुलत जाणारे नाते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित ‘समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पंढरपूरच्या वारीतील हा प्रवास असून चित्रपटातील ‘आला रे हरी आला रे ‘ व ‘सुंदर ते ध्यान’ ही दोन गाणी प्रेक्षकांसमोर आली आहेत. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचे अभंग नव्या आधुनिक अंदाजात सादर केले असून निहार शेंबेकर व जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आवाजात ही दोन गाणी आहेत. ह्या दोन गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून चित्रपटातील इतर गाणीही लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.

दिग्दर्शक ऋषी कृष्ण देशपांडे चित्रपटाबद्दल म्हणतात, ” सध्याच्या तरुण पिढीला अध्यात्माचे ज्ञान देणारा हा चित्रपट आहे. प्रेक्षकांनी ‘समायरा’च्या ट्रेलरला भरघोस प्रतिसाद दिला. तसेच गाण्यांना ही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक वारकऱ्याची एक कहाणी असते. तशीच ‘समायरा’ची सुद्धा कहाणी आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.”

ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, ‘समायरा’ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.

Leave A Reply

Translate »