बोलायला बोल का पाहिजे…” गाण्यातून ललित आणि सईचा निःशब्द संवाद

0

पुणे :लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत “मीडियम स्पाइसी” या चित्रपटातील “बोलायला बोल का पाहिजे…” हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ललित प्रभाकर हा सई ताम्हणकरच्या मागे चालत आहे आणि पार्श्वभूमीला सुरु असलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या या गाण्यातून दोघे एकमेकांशी निःशब्द संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ललितला बरेच काही विचारायचे आहे आणि सईला खूप काही सांगायचे आहे पण दोघांमधला संवाद मात्र हरवलेला आहे असे दिसते आहे. या प्रसंगात त्यांच्या मनातले प्रश्न गीतकार जितेंद्र जोशी यांनी अत्यंत सुंदर शब्दात मांडले आहेत तर संगीतकार हृषीकेश सौरभ जसराज यांनी दिलेल्या हळुवार चालीच्या या गाण्याला जसराज जोशी याच्या आवाजाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. डी.ओ.पी. राघव रामादोस आणि राहुल चौहान यांच्या छायांकनातून आपल्याला मनोहारी आणि नयनरम्य मुंबईचे दर्शन या गाण्यात होते.

प्रसिद्ध निर्मात्या विधि कासलीवाल यांची निर्मिती आणि ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, स्पृहा जोशी, इप्शिता, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग व अभिनेते रवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या “मीडियम स्पाइसी” या चित्रपटाच्या माध्यमातून युवा नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित तरुणाईचे भावविश्व दाखवणारा “मीडियम स्पाइसी” येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बोलायला बोल का पाहिजे…” हे गाणे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »