पुणे पीपल्स बँके च्या अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : वसंतपंचमीच्या दिवशी सन १९५२ साली स्थापन झालेल्या पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे अमृतमहोत्सवी वर्षात (७५) पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला बॅकेचे उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते, संचालक सीए जनार्दन रणदिवे, बबनराव भेगडे, सुभाष नडे, डॉ. रमेश सोनवणे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, वैशाली छाजेड, निशा करपे, संजीव असवले, डॉ.विश्वनाथ जाधव, स्वीकृत तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, कौस्तुभ भेगडे, उदय जग्ताप, राजेंद्र गांगर्डे, अरुण डहाके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात अमृत महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून मनोरुग्ण महिलांसाठी अजोड कार्य करणा-या माऊली सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रुपले १ लाख १ हजाराचा धनादेश, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, छोटे उद्योजक, छोटे व्यापारी व ठेवीदार यांना हक्काचे ठिकाणे वाटावे, आधार वाटावा, याकरीता ३१ जानेवारी १९५२, वसंत पंचमी च्या दिवशी पुणे पीपल्स बँकेची स्थापना झाली. ही केवळ बँक न राहता समाजसेवेचे व्रत व्हावे, जनसामान्यांचा तो एक विश्वस्त न्यास असावा या भूमिकेतून बँक सुरु झाली. तसेच आज अखंड ७४ वर्षे व्रतस्थपणे खातेदारांच्या सेवेत कार्यरत आहे. यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना उपस्थितांसाठी खास मनोरंजनपर संकर्षण व्हाया स्पृहा या विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. आजपर्यंत स्वत:च्या मालकीचे बँकेचे मुख्य कार्यालय नव्हते, आता या संचालक मंडळाच्या प्रयत्नातून अमृतमहोत्सवी वर्षात स्वत:च्या मालकीच्या वास्तूत मुख्य कार्यालय स्थलांतरीत होणार आहे. हे मुख्य कार्यालय तब्बल २६ हजार चौरस फूटांच्या वास्तूत असणार आहे.
बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड म्हणाले, संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली गेल्या १७ वर्षात एकूण व्यवसाय ४०० कोटीवरुन रु.२७५० कोटी इतकी प्रगती केली आहे. ०% एनपीए, सभासदांना १२ ते १५ टक्के दराने लाभांश ही बँकेची वैशिष्टे आहेत. यंदा बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. तज्ञ संचालक सदस्यांच्या मार्गदर्शनाने व निष्ठावंत अधिकारी- सेवकांच्या सहकार्य बँक आर्थिक दृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मार्च २०२६ अखेर किमान ५०० कोटी व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर आगामी २/३ वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रु.५००० कोटी करण्याचा संकल्प आहे. लवकरच बँकेला डायरेक्ट मेंबरशीप व शेडयुल्ड दर्जा मिळविण्यात आम्ही यशस्वी होऊ, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.