सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट, सेवा सारथी फाऊंडेशनच्या वतीने मोफत ६०० हेल्मेट वाटप

लोकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती होणे गरजेचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे मत; सूर्यदत्ता ग्रुप व सेवा सारथी फाऊंडेशनतर्फे मोफत ६०० हेल्मेट वाटप

 “रस्ते सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात व्यक्ती स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करताना दिसते, ही चिंताजनक बाब आहे. लोकांच्या मनात हेल्मेटबाबतीत जनजागृती करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांच्या सुरक्षेसाठी छोटासा हातभार म्हणून या हेल्मेट वाटप उपक्रमाचे आयोजन केले आहे. सुरक्षेसाठी विद्यार्थी आणि पालकांना नेहमीच सहकार्य करण्याची सूर्यदत्ता संस्थेची भावना आहे,” असे मत सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी ॲन्ड सेफ्टी मॅनेजमेंट आणि सेवा सारथी फाउंडेशनच्या वतीने बावधन भागातील सहाशे पालक व विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सेवा सारथी फाउंडेशन अध्यक्ष अमित तोडकर, अशोक बाफना, कल्याणी बोरा, प्रणव मुंडे, प्रशांत मुंडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक अस्लम खतीब, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीक्षार्थी मुमुक्षु कल्याणी बोरा यांनी गीत सादर केले. डॉ. सिमी रेठरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अमित तोडकर म्हणाले, “सरकारने केलेल्या हेल्मेट सक्तीचे आम्ही स्वागत करतो. हेल्मेट वाटप कार्यक्रमाचा उद्देश पालक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आहे. दुचाकीवरुन प्रवास करत असताना कोणाचाही अपघात होवू नये, पण झाला तर हेल्मेट मुळे सुरक्षा मिळते. संपूर्ण पुणे शहरात मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम घेणार आहोत.”
रस्ते अपघातात हेल्मेट नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. डोक्याला हेल्मेट असेल, तर मृत्यची शक्यता कमी होऊन दुर्दैवी प्रसंग टाळता येऊ शकतात. स्वतःच्या जीवासाठी आणि कुटुंबियांसाठी  हेल्मेट हे सुरक्षाकवच आहे. गाडीवरून प्रवास करताना हे प्रत्येकाने हेल्मेट वापरणे हिताचे असूनही हेल्मेट वापराबाबत उदासीनता दिसते, हे चिंताजनक आहे, असे अस्लम खतीब यांनी नमूद केले.

Leave A Reply

Translate »