सकाळच्या भ्रमंतीवर वाघाच्या दहशतीचं सावट!

कोरोनाचं संकट आल्यापासून प्रत्येकजण आपल्या आरोग्याप्रति सजग झालाय. यातूनच सकाळचे फिरणे, व्यायाम, सायकलिंग अशा विविध मार्गानं आरोग्य सुदृढ ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण चंद्रपूर जिल्ह्यात यावरही नवं संकट आलं आहे. हे संकट आहे हिंस्त्र श्वापदांचं. मॉर्निंग वॉकला गेलेल्या लोकांवर वाघ-बिबटे हल्ले करू लागलेत. यामुळं लोकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय.चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जंगल आहे. महामार्ग असो, ग्रामीण रस्ते असोत की शहरालगतचा भाग असो. सर्वत्र वन्यप्राण्यांची भीती आहे. नागरिक शुद्ध वातावरण मिळावं, ताजी निकोप हवा मिळावी, यासाठी भल्या पहाटेच पायी चालण्यासाठी बाहेर पडतात. बहुतांशी लोक शुद्ध हवेसाठी जंगलातील मार्गानं जातात. मात्र इथंच त्यांचा घात होतोय. पहाटेची वेळ ही वन्यजीवांचीही बाहेर भटकण्याची वेळ असल्यानं हल्ले होऊ लागलेत. जिल्ह्यात विविध भागात आतापर्यंत तीन जणांवर वाघ-बिबट्याने हल्ला करून ठार केलंय. वन्यप्राणांच्या हल्ल्याच्या घटना होत असतानाच ब्रम्हपुरी इथं रस्त्याच्या कडेला व्यायाम करणाऱ्या दोन युवकांना वाहनानं चिरडलं. त्यामुळं सकाळची भ्रमंती संकटात सापडली आहे. सध्या जिम बंद आहेत. पोलीस भरतीची घोषणा झाली आहे. त्यामुळं तरुणाई व्यायामासाठी अशा रस्त्यांचा वापर करीत आहे. मात्र तेही सुरक्षित राहिलेलं नाही. त्यामुळं आता लोकांनी स्वतःची काळजी घेऊन, दक्ष राहून आरोग्य कमवावं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

Leave A Reply

Translate »