रामभाऊ जोशी यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान
पुणे, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने २००७ पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
वयाच्या शंभरीत प्रवेश करणाऱ्या रामभाऊ जोशी यांना त्यांच्या वाढदिवशी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मिलिंद देशपांडे व प्रभाकर देशपांडे आदी उपस्थित होते.
भारतीय अभिजात संगीताची परंपरा ही जगातील दीर्घकाळ चालत आलेली संपन्न परंपरा आहे. ती टिकवण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी संगीतातील कलावंतांसोबतच अनेक व्यक्तींचेही योगदान असते. कलावंतांना आपली कला सादर करता यावी या दृष्टीने पडद्यामागे अनेकजण झटत असतात आणि म्हणूनच संगीत नेहमीच टवटवीत राहते. हेच लक्षात घेत गेली पाच दशके आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त म्हणून काम करणा-या व महोत्सवाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणा-या रामभाऊ जोशी यांना मागील वर्षीचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.
