चित्र – शिल्प संवाद’ उपक्रमाचा दिमाखात समारोप

लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीवा प्रतिष्ठान आणि दीपक मानकर यांच्या वतीने करण्यात आले होते आयोजन

  • ‘चित्र – शिल्प संवाद’ दरवर्षी घेण्याचा दीपक मानकर यांचा संकल्प

पुणे : राज्यभरातील दिग्गज चित्रकार आणि शिल्पकार यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंताचे प्रात्यक्षिक, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी ‘चित्र-शिल्प संवाद’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांना मिळाली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा समारोप रविवारी दिमाखदार सोहळ्याने झाला.

लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दीवा प्रतिष्ठान आणि दीपक मानकर यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे पाच दिवसीय ‘चित्र-शिल्प संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमात ‘चित्र–शिल्प संवाद’ मध्ये सहभागी झालेल्या सर्व चित्रकार, शिल्पकार यांचा सत्कार सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी आयोजक माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, दीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, शिल्पकार बापूसाहेब झांजे, विवेक खटावकर, दत्ता सागरे, मेघराज राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी, ‘चित्र–शिल्प संवाद’ उपक्रम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी घेण्यात येणार आहे. यंदा राज्यभरातील कलावंत यामध्ये सहभागी झाले होते, भविष्यात हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर घेण्याचा मनोदय दीपक मानकर यांनी व्यक्त केला. तसेच यंदा या उपक्रमात काढण्यात आलेली चित्र आणि शिल्प पवार साहेबांना बारामती येथे भेट देण्यात येणार असल्याचेही मानकर यांनी संगितले.

‘चित्र–शिल्प संवाद’ उपक्रमाच्या पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे शिल्प साकारले. यावेळी रामपुरे यांनी कला आणि त्याला असलेली अध्यात्माची जोड यावर भाष्य करत पुणेकरांशी संवाद साधला आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात प्रमोद कुर्लेकर यांनी यश गुळवे यांचे पोट्रेट रेखाटले तसेच चारूहास पंडित यांनी ‘चिंटू’च्या गमती – जमती मागील प्रवास उलगडत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि योगेश सुपेकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता दीपक मानकर यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाली.

चौकट

जनरल बिपीन रावत यांना शिल्पातून मानवंदना

भारतीय लष्कराचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे काही दिवसांपूर्वी लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तमिळनाडूतील कुन्नूर येथे दु:खद निधन झाले. ‘चित्र–शिल्प संवाद’ या उपक्रमात शेवटच्या दिवशी युवा शिल्पकार विराज विवेक खटावकर यांनी जनरल बिपीन रावत यांचे शिल्प साकारत त्यांना मानवंदना दिली. जनरल रावत यांच्या लष्करी वेशातील या शिल्पाला भारत देशाच्या नकाशाची जोड देत त्यांनी सर्व पदके, मानचिन्हे देखील अतिशय सुरेखपणे त्यांनी साकारली आहेत.

Leave A Reply

Translate »