Golden Victory program obituary to Late Gen. Bipin Rawat and Signature Campaign

खरा इतिहास सांगण्याची जबाबदारी आपलीच!देशाला पुन्हा सोनिया गांधींचे नेतृत्व लाभेल- बाळासाहेब थोरात

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान व काम मोठे आहे. मात्र, हे योगदान आणि काम नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे देशाचा इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्वांनी नागरिकांपर्यंत खरा इतिहास पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मत राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. तसेच देशाला पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचे नेतृत्व लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहासारखा तरुणांमध्ये देशप्रेम वाढविणारा मोठा उपक्रम अतिशय कल्पकतेने केल्याबद्दल याचे संयोजक आबा बागुल यांचे त्यांनी कौतुक करून शाबासकी दिली.


सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांच्यातर्फे सुवर्ण विजय द्विसप्ताहाचे आयोजन केले आहे. या द्विसप्ताहाअंतर्गत आयोजित केलेल्या ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ या उपक्रमात प्रथम स्वाक्षरी करून बाळासाहेब थोरात सहभागी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी व माजी आमदार उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


याप्रसंगी प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (कै.) बिपिन रावत यांच्या प्रतिमेस बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या शूर सेनानीला मनोभावे आदरांजली वाहिली.


बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, ‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1971 साली झालेले भारत-पाकिस्तान युद्ध देशाला दिशा देणारे होते. या युद्धात आणि बांगलादेशच्या निर्मितीमध्ये इंदिरा गांधी यांनी मुत्सद्देगिरी दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत कौतुक करताना इंदिरा गांधी यांचा उल्लेख ‘दुर्गामाता’ असा केला होता. यावरून दोन्ही नेत्यांचा मोठेपणा दिसून येतो,’ असे ते म्हणाले.


मात्र, आता असा मोठेपणा पहायला मिळत नाही असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात आणि देश उभारणीत काँग्रेस आणि गांधी-नेहरू घराण्याचे असलेले योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. बातम्यांमधून बदनामी करण्याचे काम केले जात आहे. गांधी-नेहरूंच्या विरोधात बोलणार्‍या महिलेला 40 जवानांचे संरक्षण देऊन पद्मश्री पुरस्कार दिला जात आहे. त्यामुळे खरा इतिहास नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडायला हवी. ही जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडली तर पुन्हा एकदा देशाला सोनिया गांधी यांचे नेतृत्व लाभेल आणि सोनियाचे दिवस येतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी असा द्विसप्ताह आयोजित केल्याबद्दल आयोजक आबा बागुल यांचे कौतुक करून म्हटले की, आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष विचारांवर उभे आहे, त्यामुळे ते आजवर टिकून आहे. धर्मावर आधारलेल्या अनेक राष्ट्रांचे अनेक तुकडे झाले आहेत. मात्र, आज आपल्या देशाची वाटचाल धर्माच्या आधारावर सुरू आहे. महात्मा गांधी, भारतीय राज्यघटना आणि स्वातंत्र्य लढा या तीन गोष्टी दत्तमूर्तीसारख्या आहेत. मात्र, आज देशातील काही लोक दत्ताच्या तीन चेहर्‍यांपैकी केवळ एकच चेहरा हवा, असे म्हणत केवळ संविधान मान्य करत आहेत. गांधी आणि स्वातंत्र लढा नाकारत आहेत असे सांगून ते म्हणाले की, ‘कंगना ही पोपट आहे, तिचा बोलविता धनी वेगळाच आहे. देशाच्या सर्वोच्च सैनिकाचा आणि सर्वांत उत्तम असलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात होतो, हे देशाला शोभणारे नाही, असेही डॉ. सप्तर्षी म्हणाले.


याप्रसंगी उल्हास पवार म्हणाले की, ‘तरुण पिढीमध्ये इतिहासातून देशभक्तीची प्रेरणा निर्माण होण्यासाठी आबा बागुल यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी आणि देशासाठी बलिदान देणार्‍यांचा अपमान केला जातो. मात्र याचा निषेध करण्यासाठी एकही साहित्यिक पुढे येत नाही, हे दुर्दैव आहे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. ते म्हणाले, ‘देशातील युवा पिढीला पंतप्रधान इंदिरा गांधींचे नेतृत्व आणि भारतीय सैन्यदलाचे कर्तृत्व याची ओळख चांगल्या रीतीने होण्यासाठी अशा द्विसप्ताहाचे मी आयोजन केले आहे. यास पुणेकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


याप्रसंगी शहरातील 25 नामवंत चित्रकारांनी साकारलेल्या ‘इंदिरा गांधी व 1971 चे युद्ध’ या विषयावरील पेंटिंग्जच्या प्रदर्शनाची पाहणी त्यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालनात केली. 16 डिसेंबर या विजयदिनी वसंतराव बागुल उद्यानात 120 फूट लांब व 40 फूट उंच पाण्याच्या पडद्यावर 20 मिनिटांची थ्रीडी लेझर फिल्मचे उद्घाटन होणार आहे. याचा तीन मिनिटांचा टीझर याप्रसंगी दाखविण्यात आला. शेवटी विरेंद्र किराड यांनी आभार मानले. घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख, नगरसेविका लता राजगुरु, सुजाता शेट्टी, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, विरेंद्र किराड, नीता रजपूत, मुख्तार शेख, जयसिंग भोसले, नरेंद्रपालसिंग बक्षी, सौ. जयश्री बागुल, अमित बागुल तसेच ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Translate »