सुरेंद्र पठारेंच्या भाजप प्रवेश चर्चेमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात खळबळ
https://www.instagram.com/reel/DQPEp-rDc3i/?igsh=MXVibmg4enFpYnpxZw==
पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्यांनी पठारेंविरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेल्या बापूसाहेब पठारेंना महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, तसेच दलीत, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा मोठा पाठिंबा लाभला होता. या विजयात सुरेंद्र पठारे यांच्या चाणक्यनीतीचा मोठा वाटा असल्याचे तुतारी कार्यकर्ते सांगत होते. परंतु, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द सुरेंद्र पठारे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने तुतारीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
सुरेंद्र पठारे यांनी माजी आमदार जगदिश मुळीक आणि काही भाजप इच्छुकांच्या भेटी घेतल्याची माहिती पुढे आली असून, या हालचालींमुळे तुतारी कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तुतारी कार्यकर्त्यांनी सुरेंद्र पठारे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांची भेट घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्याचे ठरवले आहे. तसेच, “गद्दारांना धडा शिकवा” अशी सोशल मीडिया मोहिमही सुरू करण्याची रणनीती आखली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमध्ये शिवसेना, तुतारी आणि काँग्रेसमधील काही इच्छुक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विरोधी प्रचार मोहिम राबविण्याची तयारी केली असून, त्याला भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. पठारेंच्या प्रवेशानंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
राजकीय निरीक्षकांचे मत :
भाजप प्रवेशावर शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये नाराजीची शक्यता असून, येरवडा प्रभागात तुतारीला फटका बसू शकतो.
“सत्तेसाठी पक्षांतर” करत असल्याची टीका वाढू लागली आहे.
सुरेंद्र पठारे यांनी भाजप नेते जगदीश मुळीक आणि माजी नगरसेवकांशी झालेल्या गाठीभेटींमुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात आमदार बापू पठारे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पठारे त्यांच्या मुलाच्या विरोधात तुतीरीचा सक्षम उमेदवार देणार का.? आमदार पठारे मुलाचा प्रचार करणार की तुतीरीच्या उमेदवारांचा ?
यामुळे जर सुरेंद्र पठारे भाजप मध्ये गेले. तर, पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी तुतारीचे कार्यकर्ते गुप्त बैठका घेऊ लागले आहे.
