माणुसकीचे, मूल्यांचे बीज रोवणारे शिक्षण गरजेचे : प्रा. डॉ. माधवी खरात

पुणे : “शिक्षक हा समाज घडवत असतो. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची, बंधुतेची भावना जोपासण्याचे काम लोकशिक्षक करत असतात. आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच माणुसकीचे, नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. साहित्यातून, संमेलनातून ते सहज होते. ‘माणूस’पणाची जाणीव करून देणारी ही संमेलने खऱ्या अर्थाने ऊर्जेची केंद्रे आहेत,” असे प्रतिपादन आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. माधवी खरात यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांच्या हस्ते झाले. प्रसंगी स्वागताध्यक्ष माजी आमदार ॲड. राम कांडगे, बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, रयत शिक्षण संस्थेचे किसन रत्नपारखी, महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर, बंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस शंकर आथरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सूर्यकांत सरवदे, रविंद्र जाधव आणि चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्यांना साने गुरुजी गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांचा ‘जाऊ कवितेच्या गावा’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर झाला.

प्रा. डॉ. माधवी खरात म्हणाल्या, “साहित्य माणसाला उभे करण्याचे काम करते. संस्कृतीचा प्रसार, स्वातंत्र्य, समता बंधुता न्याय हा विचार देण्यारे साहित्य मार्गदर्शक आहे. त्यामुळे वंचितांना, दुर्लक्षित घटकांना आत्मसन्मान देणारे साहित्य निर्माण व्हावे. साहित्यामुळे क्रांतीची ज्योत पेटते. शिक्षण क्रांतीचे मूळ आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अस्थिर मानसिकता ओळखत पाठ्यपुस्तक पलीकडे शिक्षण द्यायला हवे. बुद्धीला, विचारांना चांगले वळण लावण्याचे काम शिक्षकांचे असते. स्त्रीशक्तीचा गौरव, सन्मान करण्याची मानसिकता आपण रुजवायला हवी. गेल्या साडेचार दशकांपासून बंधुताचार्य प्रकाश रोकडे संमेलनातून समाजशिक्षण देण्याचे काम करत आहेत.”

हरिश्चंद्र गडसिंग म्हणाले, “भारतीय शिक्षणपद्धती प्रभावी आणि जगमान्य होती. तक्षशिला, नालंदा ही शिक्षण केंद्रे होती. बंधुभाव, देशप्रेम जपणारा संवेदनशील भारतीय समाजाला छळण्यास सुरुवात केली. संत साहित्याचा वारसा नसलेल्या लोकांनी सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या काळात शिक्षण पद्धतीचा अंत झाला. मेकॉलेने भारतीय शिक्षण पद्धतीचा नाश केला. दुर्दैवाने तत्कालीन काळात ही स्वीकारली गेली, ती केवळ पोट भरण्यायोग्य आणि चाकरी करण्यासाठी होती. मानसिकता खराब झाली. मूल्यांचा अंतर्भाव करायला हवा. वैश्विक स्तरावरील शिक्षण घेतल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही.”

ॲड. राम कांडगे स्वागत भाषणात म्हणाले, “महाराष्ट्राला मानवतेचा, बंधुतेचा संदेश देणारी मोठी संत परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी सांगितलेला विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.” बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले.

Leave A Reply

Translate »