आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत पूजन व वारकरी बांधवाना उपयुक्त साहित्य वाटप सोहळ्याचे आयोजन

0

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या आयोजनाने पार पडणार सोहळा

पुणे :आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील दिंड्या आणि भजनी मंडळांना वारीसाठी आवश्यक साहित्याचे वाटप तसेच संत पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या आयोजनाने व प्रमुख मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय कार्यक्रम पार पडणार आहे.

हा कार्यक्रम ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे सयोजक गिरीश खत्री यांनी केले असून, वारीतील सहभागी दिंड्यांना व भजनी मंडळांना वारीच्या प्रवासात उपयुक्त ठरणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना शिवस्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संयोजक गिरीश खत्री म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही केवळ एक धार्मिक चळवळ नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा गाभा आहे. संतांच्या विचारांनी भारावलेल्या या परंपरेत समाजाला एकत्र बांधण्याची विलक्षण ताकद आहे. आषाढी वारी ही केवळ एक पदयात्रा नसून, ती श्रद्धेची, भक्तीची आणि सामूहिक चैतन्याची जिवंत साक्ष आहे.

वारीत सहभागी होणारे वारकरी, भजनी मंडळे आणि दिंड्या हे सर्वजण अत्यंत साधेपणाने आणि निःस्वार्थ भावनेने पंढरीच्या विठोबा दर्शनासाठी निघतात. या सेवेला ‘कर्तव्य’ समजून आम्ही त्यांच्या लाडक्या वारीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करत आहोत. हे वाटप म्हणजे कोणतीही मदत नव्हे, तर ही आमची संत परंपरेप्रती असलेली कृतज्ञता आणि आपुलकीची भावना आहे.

मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साध्य होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मनातही वारकरी संप्रदायाबद्दल विशेष आदर असून, त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही हा सोहळा अधिक भव्य आणि भक्तिमय करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे सुश्राव्य आणि भावस्पर्शी कीर्तन हे असणार आहे. सोबतच सर्व प्रमुख देवस्थान (पंढरपुर ,देहु ,आळंदी ….)आदि संस्थानांचे प्रमुख या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत, महत्वाचे म्हणजे केंद्रीय नागरी उड्डायन व सहकार मंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ, राज्यसभेच्या खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी, तसेच राष्ट्रसंत ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचा समावेश आहे.कोथरूड परिसरातील सर्व भजनी मंडळे, दिंड्यांचे प्रमुख व मोठ्या संख्येने वैष्णव यावेळी उपस्थित राहणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क: कुमार खत्री- +91 96575 75760 )

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »