डीपीजीयूमध्ये २२ नोव्हेंबरला ‘बेन्झाइतेन जपानी भाषा अध्ययन केंद्रा’चे उद्घाटन

जपानी भाषा शिक्षणासह भारत-जपान शैक्षणिक व सांस्कृतिक संबंधांना मिळणार नवी दिशा

पुणे : डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी चे ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये (डीपीजीयू) पुणे रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत ‘बेन्झाइतेन जपानी भाषा अध्ययन केंद्रा’चे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जपानी भाषेचे ज्ञान मिळवून देण्यासोबतच भारत आणि जपान यांच्यातील शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

 

जागतिक स्तरावर शिक्षण, रोजगार आणि करिअरच्या वाढत्या संधी लक्षात घेता परदेशी भाषांचे ज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व व्यावसायिक संधींसाठी सक्षम करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

 

या उद्घाटन सोहळ्यास जपानमधील ओकायामा प्रांताचे गव्हर्नर रयुता इबारागी, ओकायामा प्रीफेक्चरल असेंब्लीचे अध्यक्ष मसाताका ओटा, मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी, ओकायामा विद्यापीठाचे अध्यक्ष यासुतोमो नासू आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी बाबासाहेब लांडगे उपस्थित राहणार आहेत.

 

तसेच डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती डॉ. सोमनाथ पी. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहिणी एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

यावेळी बोलताना विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. सोमनाथ पी. पाटील म्हणाले, “बेन्झाइतेन जपानी भाषा अध्ययन केंद्र सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. एखाद्या देशाची भाषा शिकणे म्हणजे त्या देशाची संस्कृती, विचार आणि कार्यपद्धती समजून घेण्याची पहिली पायरी आहे. जपानकडून शिक्षण, तंत्रज्ञान आणि शिस्त या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवी भाषा शिकण्यासोबतच जागतिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळेल. भारत आणि जपानमधील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे दोन्ही देशांतील सहकार्याचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.”

 

या केंद्राच्या माध्यमातून जपानमध्ये उच्च शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व भाषा शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. जपानी कला, परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच भारतीय संस्कृतीची माहिती जपानी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही हे केंद्र महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. ओकायामा प्रांत आणि ओकायामा विद्यापीठाच्या मान्यवरांची उपस्थिती भविष्यातील शैक्षणिक देवाणघेवाण आणि सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Comments are closed.

Translate »