अज्ञानामुळे आलेल्या अडचणी तंत्रज्ञानामुळे दूर करण्यात यश – ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ

0

“सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना” पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- आदिवासींना सरकारने सामूहिक वनहक्क दिला असला तरी जंगलातील दुर्मीळ वनस्पतींची माहिती जगापर्यंत पोहचविण्यामध्ये अज्ञानाचा अडसर होता. वनस्पतींबाबत शास्त्रीय ज्ञान देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मात्र, काळानुसार तंत्रज्ञान बदलत गेले. गुगल लेन्सद्वारे वनस्पतींबाबत सहज माहिती उपलब्ध होत गेली. त्यामुळे शास्त्रज्ञांची गरज उरली नाही. गडचिरोली भागातील आदिवासींनी व्हॉट्सअॅपद्वारे वनस्पतींची छायाचित्रे टाकून त्याची माहिती संकलित केली. या वनस्पतींना बाजारपेठ मिळवून अर्थार्जनही केले. अज्ञानामुळे आलेल्या अडचणी तंत्रज्ञानामुळे दूर झाल्या, असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर लिखित ‘सामूहिक वनहक्कप्राप्त क्षेत्रासाठी वन संरक्षण व व्यवस्थापन कार्ययोजना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वनराई संस्थेत पार पडला. याचे प्रकाशन माजी खासदार प्रदीप रावत यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी डॉ. गाडगीळ बोलत होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त समीर कुर्तकोटी, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, सदुराम मडावी, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, धन्यकुमार चोरडिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राची क्षीरसागर यांनी केले. प्रास्ताविक अमित वाडेकर यांनी केले तर आभार रोहिदास मोरे यांनी मानले.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ म्हणाले की, अनुभवजन्य ज्ञान आदिवासी तरुणांकडे आहे, त्यांच्याकडे शास्त्रीय ज्ञान नव्हते. त्यासाठी जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र जीव जाती ओळख असा अभ्यासक्रम गरजेचा होता. म्हणून आम्ही त्यांच्या ज्ञानाला चौकटीत बांधले व साचेबद्ध केले. पूर्वीच्या तुलनेत आज लोकांना खूप गोष्टी सहज करणे शक्य आहे. उच्चवर्णीय व वरच्या वर्गांने आपल्याकडे असलेले ज्ञान कनिष्ठाकडे देत नव्हते हीच परंपरा शास्त्रज्ञांनी देखील जोपासली. वनस्पतींबाबत शास्त्रीय ज्ञान देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मात्र काळानुसार तंत्रज्ञान बदलत गेले. गुगल लेन्स द्वारे वनस्पती बाबत सहज माहिती उपलब्ध होत गेली. त्यामुळे शास्त्रज्ञांची गरज उरली नाही. अज्ञानामुळे आलेल्या अडचणी तंत्रज्ञानामुळे भराभर दूर झाल्या. इंग्रजी भाषेमुळे ज्ञान आत्मसात करण्यात अडचणी येतात मात्र सगळंच ज्ञान हे केवळ इंग्रजीत भाषेत आहे असेही नाही.

माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले की, ज्ञानभाषा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जगातील भाषेतील ज्ञान आपल्या भाषेत आणले पाहिजे. आदिवासींच्या भाषेतील ज्ञान एआय आणि गुगलवर येण्यास लवकर सुरुवात होईल असे सकारात्मक वातावरण आहे. लहान बालकांमध्ये भाषेवरून आपण गोंगाट निर्माण करत आहोत. त्यांना “नॉलेज” नाही तर “नोइज” मिळत आहे. भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषा ही गरजेची आहे. आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध आहोत नैतिक दृष्ट्या उन्नत असले पाहिजे असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी निर्मल वारी योजना कशा पद्धतीने यशस्वी झाली याची कहाणी सांगितली.

महाराष्ट्र वनभूषण चैत्राम पवार म्हणाले की, वनवासी बांधवांनी नेहमीच जंगलांचे रक्षणच केले आहे आणि सेवाही केली आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि सक्षमीकरण याचबरोबरीने वनहक्क कायदा, कृषी विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर वनवासी क्षेत्रात काम करत असताना बारिपाडा गावात PBR म्हणजेच पिपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपक्रम राबवून पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय वारसा जपण्यासाठीचा आदर्श निर्माण केल्यामुळे बारिपाडाची ओळख निर्माण होत आहे.

डॉ. विजय एदलाबादकर म्हणाले की, प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर सिध्द झालेली आणि अनुभवसंपन्न ज्ञानावर आधारित प्रस्तुत मार्गदर्शिका जमिनीवर ‘वन कार्य योजना’ तयार करणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट उपयुक्त पडावी, अशा पद्धतीने लिहिलेली आहे. त्यामुळे ती ग्रामसभांच्या वन संसाधनांशी संबंधित ग्रामविकास आराखड्याचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरेलच. शिवाय वन हक्क समित्यांच्या सक्षमीकरणालाही हातभार लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Translate »