पुणे: “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतानाच या नव्या पिढीला आपल्या ओजस्वी, तेजस्वी व तपस्वी भारतीय संस्कृती-परंपरेची व ऐतिहासिक वारशाची ओळख करून द्यायला हवी. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त यंदा प्रथमच महिनाभर ‘सूर्योत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यातून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. ‘विकसित भारत’ साकार करण्यासाठी नव्या पिढीने कसे योगदान द्यावे, याविषयी विचारमंथन होत आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत केले. ‘सूर्योत्सव २०२५’ या विशेष महोत्सवाच्या निमित्ताने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. हॉटेल श्रेयस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संचालक प्रशांत पितालिया, सूर्यदत्त विधी महाविद्यालयच्या प्राचार्य केतकी बापट आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. विविध शाखांचे विद्यार्थी एखाद्या विषयावर कशाप्रकारे विचार करतात, वेगवेगळ्या संस्थामध्ये कोणत्या प्रकारे ज्ञान दिले जाते याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात किल्ले बांधणी कशी झाली, ऐतिहासिक स्थळे कशाप्रकारे निर्माण केले गेले, कोणते तंत्रज्ञान वापरले गेले, एनडीए आणि संरक्षण दलामध्ये कोणत्या करिअर संधी आहेत, या आणि अशा अनेक विषयांची ओळख विद्यार्थी जाणून घेत आहेत. मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. त्यातून ते अधिक समृध्द होत आहेत.”
“संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर ‘सूर्यदत्त’ने नेहमी भर दिला आहे. यंदा ‘सूर्यदत्त’ला २६ वर्ष पूर्ण होत आहे. प्राध्यापकानी विद्यार्थ्यांना केवळ वर्गात शिक्षण न देता त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देणे आवश्यक आहे. बदलत्या काळात भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. यादृष्टीने समाजातील तज्ञ व्यक्तींचे विचार विद्यार्थ्यांना समजण्यासाठी व्याख्यानाचे माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण भागात ज्या मुलींना शाळेत जाण्यासाठी अडचण जाणवते, त्यांना सायकल वाटप उपक्रम आम्ही राबवतो. मुले किंवा मुली चुकीच्या गोष्टीला बळी पडू नयेत. त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानधारणा व कराटे प्रशिक्षण देण्यात येते. त्यातून विद्यार्थ्यांत शिस्तदेखील निर्माण होते. स्टार्टअपचे बीज शालेय जीवनापासून रुजावे, याकरिता आम्ही काम सुरू केले आहे. ‘एआय’ आधारित प्रशिक्षण दिले जाते.”
“पुण्यात अनेक संस्था केवळ ८ ते १० तास कार्यरत असतात. उर्वरित वेळेत त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या पायाभूत सुविधा पडून असतात. त्यामध्ये सभागृह, वर्गखोल्या, प्रयोगशाळा आदींचा समावेश असतो. अशा गोष्टींचा वापर करण्यास उभरत्या उद्योजकांना, ज्येष्ठ नागरिकांना, स्टार्टअप करू इच्छिणाऱ्याना द्यायला हवा. आंतरशाखीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी सातत्याने हायजेन, आरोग्य विकास याबाबत विद्यार्थी यांच्याशी मनमोकळे चर्चा करण्यात येते. सध्या विभक्त कुटुंब व्यवस्था यामुळे वृध्दाश्रम संख्या वाढत आहे, त्यामुळे घरात एखादी गोष्ट समजून सांगणारे ज्येष्ठ राहिलेले नाहीत. विद्यार्थ्यांचा ज्येष्ठांशी संवाद कार्यक्रम आयोजिला जातो. वृद्धाश्रमऐवजी सेवाश्रम असायला हवेत. त्यासाठी भारतीय संस्कृती, एकत्रित कुटुंबपद्धती, संस्कार, मूल्यांची जपणूक या गोष्टी नव्या पिढीमध्ये रुजायला हव्यात,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
परिपूर्ण, स्वयंपूर्ण आणि परिवर्तनशील विद्यार्थी घडविण्याचे काम सूर्यदत्त करत असल्याचे प्रशांत पितालिया यांनी सांगितले. सर्वांगीण विकास आणि भावनांक वृद्धीसाठी संस्थेत नियमित उपक्रमांचे आयोजन होत असल्याने येथील विद्यार्थी सर्वांमध्ये अधिक उठून दिसतात, अशी भावना केतकी बापट यांनी व्यक्त केली.
