“कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद; विजयाचा ‘कोथरूड पॅटर्न’!”
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. कोथरूड परिसरातील सोसायट्यांमध्ये संपर्क साधून आणि तेथील मतदारांशी संवाद साधून चंद्रकांतदादा हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तर त्यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. कोथरूडमध्ये विरोधी पक्षांतर्फे कोण उमेदवार, हे निश्चित होण्यापूर्वीच चंद्रकांतदादांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पदयात्रेद्वारे अनेक ठिकाणी पोहोचलेसुद्धा ! चंद्रकांत दादांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत जो जनसागर उसळला होता, तो पाहता कोथरूडमधून त्यांचा विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. ‘आरंभ है प्रचंड’ असे म्हणतच त्यांचे अनेक कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत, पुढील वीस दिवस चंद्रकांत दादांसाठी, त्यांच्या विजयासाठी देण्याचे सर्वांनी निश्चित केले असल्याचे दिसत आहे.
प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी
चंद्रकांत दादांच्या पदयात्रांचा किंवा प्रचाराचा सहज कानोसा घेतला तर सोसायट्यांच्या समस्या सोडवत असतानाच, त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे. या समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कोथरूड मतदारसंघामध्ये प्रचाराचा पहिला टप्पा चंद्रकांत दादांनी धुमधडाक्यात सुरू केला असून कोथरूड परिसरातील अनेक सोसायट्यांमधून संपर्क साधत आणि तेथील नागरिकांशी संवाद साधत असतानाच या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटून चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात त्यांनी कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पौड रस्ता या परिसरातील सोसायट्यांना त्यांनी भेट देण्यासाठी जोमात सुरुवात केली आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत दादांना उमेदवारी मिळणार हे पूर्वीचे निश्चित झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. याउलट विरोधकांतर्फे कोण, हा घोळ आणि चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरूच होते. उमेदवार शोधणे, त्याला सक्रिय करणे ही विरोधकांची मोठी मोहीम ठळकपणे दिसून आली. हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे राहणार आणि चंद्रकांतदादा हेच उमेदवार असणार, हे आधीच ठरल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचे सूत्र आधीच निश्चित झाले होते आणि त्यानुरूप प्रचाराला सुरुवातही झाली आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवाराचे त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, झटून कामाला लागले असून अतिशय सूक्ष्म नियोजन, प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम यांची आखणी झाली आहे. त्याप्रमाणे गाठीभेटींवर भर देण्यात आला आहे.
२४ तास उपलब्ध असणारा आमदार
चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल या मतदारसंघात अतिशय आपुलकी असून २४ तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला हवा आहे, असे मत कोथरूडकर व्यक्त करताना दिसतात. आधी प्रदेशाध्यक्ष असताना किंवा नंतर मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही चंद्रकांत दादा केव्हाही उपलब्ध असल्याची भावना, त्याचप्रमाणे संकटकाळी धावून जाणारा आमचा नेता असल्याचे अनेक जण बोलून दाखवतात. सुशिक्षित, उच्चभ्रू त्याचप्रमाणे काही गोरगरीब जनतेचा बनलेला हा मतदारसंघ असून गेल्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरही चंद्रकांतदादांनी मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्क ठेवला असल्यामुळे त्यांचे स्वागत ‘आपल्या घरातील उमेदवार’ असल्यासारखे सर्वत्र होत आहे, हाच त्यांचा ‘कोथरूड पॅटर्न’ त्यांना विजयश्रीकडे घेऊन जाणार असल्याची भावना मतदार बोलून दाखवत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या परिसरातील व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणाऱ्या चंद्रकांत दादांबद्दल प्रचंड जिव्हाळा तर आहेच. पण वृद्ध नागरिकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्याप्रमाणे केलेल्या योजनादेखील नागरिक उत्साहाने आणि आपलेपणाने बोलून दाखवत आहेत. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा आणि एकात्मतेचा निर्णय होणार आहे, त्यासाठी राज्यामध्ये ‘महायुती’ ची सत्ता येणे आवश्यक आहे, आणि म्हणूनच चंद्रकांतदादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलून दाखवतात. गेल्या आठवड्याभरात चंद्रकांत दादांनी कोथरूड परिसरातील गाठीभेटींमध्ये प्रामुख्याने पक्षांतर्गत असंतुष्टांच्या भेटी, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, जाहिरात क्षेत्रातील बुजूर्ग, अध्यात्मिक संस्था, प्रख्यात व्यावसायिक, कलाक्षेत्रातील दिग्गज यांच्याशी संपर्क साधला आणि सर्वत्र त्यांचे आपुलकीने स्वागत झाले. कोथरूडमध्ये एकूणच भगवे वातावरण तयार झाले असून चंद्रकांतदादांचा दांडगा व्यासंग त्यांना नक्कीच यशस्वी करून जाणार असल्याचे बोललं जात आहे.