पुन्हा एकदा कोथरूडच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याच्या संधी: चंद्रकांत पाटील

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. या यादीत कोथरूड मतदारसंघातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीबाबत चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानत पुन्हा एकदा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत कोथरूडमध्ये भाजपची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील विविध विकास कामे, तरुण मुली व महिलांसाठीच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी केली गेली आहे. भाजपाचे राज्यभरातील उमेदवार जाहीर होत असताना, कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

कोथरूडमधील माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो, तुमच्या प्रेम आणि विश्वासाने मला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत तुमचा प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली आहे. या संधीसाठी मी सर्व कोथरुडकरांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमचे आशीर्वाद आणि पाठबळ हेच माझे प्रेरणास्थान आहे. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे मला पुन्हा एकदा कोथरूडच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याच्या संधीचे भाग्य लाभले आहे. मला ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मनःपूर्वक धन्यवाद. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

तसेच माझ्यावर वेळोवेळी दर्शविलेल्या विश्वासाबद्दल मी भारतीय जनता पार्टीचेही या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी अविरत प्रयत्न करेन, असे वचन देतो. असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपाच्या यादीत अन्य महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे देखील समाविष्ट करण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आणि तयारी जोरात सुरु असून, महाराष्ट्रात विकासाच्या अजेंड्यावर पक्ष भर देणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले आहे.

Leave A Reply

Translate »