अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीतकार शौनक अभिषेकी, डॉ.भावार्थ देखणे यांना मंडई म्हसोबा ट्रस्टचे भूषण पुरस्कार

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा १ ते ५ आॅगस्ट २०२४ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीतकार शौनक अभिषेकी, डॉ.भावार्थ देखणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर, अबोली सुपेकरे आदी उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार बन्सीलाल क्लॉथ मार्केटचे संचालक राजकुमार अग्रवाल, उद्योग भूषण पुरस्कार आर. के.लुंकड हौसिंग कॉर्पोरेशनचे संचालक रमनशेठ लुंकड, कला भूषण पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार व गायक शौनक अभिषेकी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची व पोलीस गणेश गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दिनांक ५ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता होणा-या कार्यक्रमाला ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. सुरेश तळवळकर, पद्मश्री पं. विजय घाटे, आमदार पंकजा मुंडे, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी महिला बचतगट स्पर्धा पारितोषिक वितरण अभिनेत्री नीषानी बुरुले, शिवानी मुंधेकर, मयुरी देशमुख व अभिनेता अभिषेक रहाळकर यांच्या हस्ते होईल. महिला बचत गट स्पधेर्तील विजेत्यांना एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. मंडई बुरूड आळीतील मुख्य मंदिरासमोरील उत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून गुरुवार, दि. १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पुणे शहरातील गरजवंत विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व भोजन देण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता स्व.सी.आर.रंगनाथन निवासी कर्णबधीर विद्यालयास ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत व विद्यार्थी भोजन कार्यक्रम होईल. शनिवार, दि. ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पोतराज समाजातील मुलांसाठी कार्यरत सह्याद्री मेडिकल एज्युकेशन फाऊंडेशन संस्थेला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

संपूर्ण उत्सवातील विविध कार्यक्रमांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ.मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अ‍ॅड.सुषमा अंधारे, पार्थ पवार, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, शैलेश बलकवडे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार देव महाराज, पुनीत बालन, परिमंडळ २ पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील, अमोल झेंडे, सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, विश्वकर्मा ग्रुपच्या संचालिका तृप्ती अग्रवाल, कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, युवराज ढमाले कॉर्पचे संचालक युवराज ढमाले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, भजनी मंडळाचे कार्यक्रम, ढोल-ताशा वादन होणार आहे.

  • दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव
    रविवार, दिनांक ४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Translate »