आज ‘कबीर’ हवा आहे! प्रा.रतनलाल सोनग्रा

पुणे: आज २२ जून संत कबीर जयंती. पंधरावे शतक हे जगाचे प्रबोधन युग होते. त्यावेळी युरोपात देखील भ्रष्ट धर्म मार्तंडाविरूद्ध डिव्हाईन कॅामेडी लिहली गेली… ज्ञानाची केंद्रे बदलली-परिश्रम करणार्‍या जमातीत मानवतावादी संतांचा उदय झाला. भारतात देखील त्यावेळी उत्तर भारतात संत कबीर, संत रविदास, संत धामीदास यांचा उदय झाला.

संत कबीरांनी सामाजिक जीवनात जातियवाद, अंधश्रद्धा,विषमता, हिंदू-मुस्लिम भेद यावर जोराचे प्रहार करून सर्वसामान्य माणसाला मोठी हिम्मत दिली! लोकांना आपल्या बुद्धिचा वापर करून निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. ‘देव कुठे आहे’?

कबीर म्हणतात,लोक कुठे कुठे देव शोधायला जातात.पण त्यांना देव कुठे भेटत नाही. तीर्थक्षेत्रात पुजारी पुरोहितांचे स्वार्थी दर्शन घडते. गंगेत स्नान करून पाप क्षालनाची सोय करून माणसाचे जीवन नीतीमान करण्यापेक्षा त्यांना मुक्तीचे आश्वासन दिसते.कबीर म्हणतात, ‘हे माणसा तू देव कुठे शोधतोस?’ कबीराचे एक पद मी मराठीत अनुवाद केले असून त्यात ते म्हणतात. कुठे शोधिसी मजला जीवा मी तर बिकट निवासी! हे माणसा तू माझा शोध घेण्यासाठी कुठे कुठे जातोस? पण मी तर तुझ्या अगदी जवळ आहे. माणूस दूरवर पहातो पण त्याला जवळची वस्तु दिसत नाही. पुढे कबीर म्हणतात, “ नाही मंदिरी,नसे मशिदी ना काबा कैलासी देव मंदिरात भेटणार नाही. मशिदीत भेटणार नाही. काबा कैलासमध्ये ही भेटणार नाही. पुढे ते म्हणतात नाही कोणत्या क्रियाकर्मी,नाही योग वैरागी! कुठला योग प्रयोग आणि हटयोग करून माझी प्राप्ती होणार नाही-योगी वैरागी बनून देखील हे होणार नाही.. संसार कबीर म्हणतात, ‘हे माणसा तू जर खरा शोधक असशील तर मी क्षणार्धात तुला भेटेन, कारण मीच तुझ्या श्वासविश्वासात आहे. माणसाच्या अंत:करणात परमेश्वर लपून बसला आहे. जीवावर प्रेम करा. माणसावर प्रेम करा.

वारकरी सांप्रदायात एकमेकांना प्रणाम करून ‘माऊली’ म्हणण्याची रीत आहे.. वारकरी मंडळी एकमेकांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला प्रणाम करतात.

आज भारतात सत्ता कारणावरून भेद, पंथभेद, जातिभेद यांचा कहर आपणास दिसतो आहे. या सर्वांना एकत्र बांधण्याचा धागा म्हणजे प्रेम आहे. ‘भारतीय’ म्हणून आपणाला सर्वधर्मसमभाव ठेऊन जगापुढे आदर्श ठेवायचा आहे. ‘वसुधैव कुटूंबकम’ चा ऐक्य संदेश संत कबीर आपल्या वाणीतून घडवतात.म्हणून कधी नव्हे तर आत संत कबीराच्या शिकवणुकीची गरज आहे कारण आज प्रत्येक जाती जमातीने आपले संत वाटून घेतले आहेत.. त्यामुळे त्यांच्या जयंत्या जातीनिहाय साजर्‍या होतात. कबीराची कुठलीच जात नसल्याने त्यांचा सार्वजनिक जीवनात कार्यक्रम फारसे दिसत नाही म्हणून कबीर हा सर्व भारतीयांचा आहे. जो जो भारतीय असेल त्याची ओळख सांगायची झाली तर ज्याला कबीराचा एक दोहा येत असेल तो भारतीय! आणि त्याला ज्ञानेश्वरांची एक ओवी आणि तुकारामचा एक अभंग येत असेल तो मराठी माणूस! आज कबीर जयंतीच्या निमित्ताने त्याला कृतज्ञतेचे अभिवादन!

Leave A Reply

Translate »