संस्कारक्षम विद्यार्थी देशाचे उज्वल भवितव्य घडवू शकतात – सुनील देवधर

पुणे: मोबाईल फोनच्या आहारी जात असलेली आजची तरुण पिढी आणि विद्यार्थी हे संस्कृती पासून दूर जात आहेत, त्यामुळे त्यांच्यावर संस्कार करणे हे पालकांवर एक प्रकारे आव्हान निर्माण झाले असून सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या तरुणांपेक्षा संस्कारक्षम विद्यार्थी हेच खऱ्या अर्थाने देशाचे उज्वल भवितव्य घडवू शकतात. असे संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेस करत आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

“मातृ नाम प्रथम” अंतर्गत मातृ वंदना सोहळा आणि “विद्यार्थी हिताय, पालक सुखाय” या व्याख्यानमालेचे उद्घाटन सुनील देवधर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विपश्यना पुणे केंद्राचे माजी प्रमुख डॉ. दत्ताजी कोहिनकर, महिला आणि बालकल्याण विभागाच्या सदस्या प्राध्यापिका आसमा शेख, यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेसचे संस्थापक व संचालक शीतल नलिनी आदगौडा पाटील, उज्वला एस. पाटील, संचालक हर्षवर्धन पाटील, संचालिका शशिकला पाटील, अर्जुन पाटील आदि यावेळी उपस्थित होते.

सुनील देवधर म्हणाले, चांगला माणूस घडण्यासाठी डोक्यात बर्फ, जिभेवर साखर आणि हृदयामध्ये ज्वाला ठेवली पाहिजे. परीक्षेतील गुणांवरून पालकांनी कधीही आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची पारख करू नये. परीक्षेतील गुणांपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्याला यशस्वी करत असतात. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांना परीक्षार्थी करण्यापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वातील गुणांची जोपासना करण्यावर पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
पालकांनी मुलांच्या गुणांचे कौतुक करायला शिकले पाहिजे. केवळ त्यांच्या चुकीच्या गुणांवर बोलून त्यांचे मानसिक खच्चीकरण करू नका. तसेच मुलांना केवळ पुस्तकी किडा बनविण्यापेक्षा त्याच्यातील इतर गुण कसे वाढीला लागतील याकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मोबाईलमुळे पालक आणि मुले यांच्यातील संवाद अतिशय कमी झाला आहे, हा संवाद वाढविण्यासाठी त्यांना संस्कारक्षम बनविणे गरजेचे आहे. याची जबाबदारी शाळा आणि पालकांची आहे. संस्कारक्षम जर विद्यार्थी घडले तरच भविष्यातील समृद्ध भारत आपण घडवू शकतो असेही सुनील देवधर यांनी यावेळी सांगितले.

प्रा. आसमा शेख म्हणाल्या, मुलांमध्ये लहान वयातच संस्कार आणि मूल्य रुजवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे त्या प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेस करत आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, रवींद्रनाथ टागोर यांचे विचार जपणारे विद्यार्थी देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात, ही पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेस करत आहे.

दत्ताजी कोहिनकर म्हणाले, केवळ मार्कांच्या जगामध्ये गर्दी वाढत असताना आपला मुलगा हा गुणवान आणि इतर मुलांपेक्षा वेगळा झाला पाहिजे असा ध्यास पालकांनी घेतला पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांची देशाला गरज आहे मुलांनीही आपल्या यशामध्ये आपल्या पालकांचा मोठा वाटा आहे हे लक्षात घेऊन त्यांना कधीही दुखवू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

प्रा. शीतल पाटील म्हणाले, यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेस यांच्या माध्यमातून केवळ मार्कांच्या मागे धावणारी पिढी घडविण्यापेक्षा मूल्यांचे शिक्षण देऊन चांगला माणूस घडविणे हे आमचे महत्त्वाचे उद्देश आहे, याचाच एक भाग म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढविणे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविणे यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. मदर्स डे निमित्त एखादा केक कापणे, बाहेर जेवायला जाणे किंवा आईला ग्रीटिंग देणे या सर्व गोष्टींपलीकडे जाऊन आयुष्यभरासाठी आईला सन्मानित करता येईल अशी भेट आईला देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आईचं नाव वडिलांच्या नावाच्या आधी लावणे म्हणजेच “मातृ नाम प्रथम” हा उपक्रम गेल्या वर्षी यशवंत इन्स्टिट्यूट आणि टाकळकर क्लासेस तर्फे सुरू करण्यात आला. ही भेट देताना आजकाल मुलं आईबरोबर ज्या पद्धतीने वागतात ती पद्धत चुकीची आहे, त्याची जाणीव करून देऊन आईला क्षमा मागणे आणि आईचं नाव कायमस्वरूपी आपल्या नावामध्ये आणणे तिच्या नावाला प्रतिष्ठा देणे हा याचा उद्देश आहे. आमच्या उपक्रमानंतर राज्य शासनाने आईचं नाव मुलांनी आपल्या नावाच्या मध्ये वापरायचं असा अध्यादेश पण काढलाय त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे खूप अभिनंदन. यावर्षीपासून आम्ही या मातृदिनाच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमापासून वर्षभर चालणारी “विद्यार्थी हिताय, पालक सुखाय” ही व्याख्यानमाला सुरु केली आहे जी वर्षभर चालेल.

Leave A Reply

Translate »