तृणधान्य खा, व्हायरस पासून दूर रहा  – डॉ. बुधाजीराव मुळीक

वनराईच्या ‘लघु-तृणधान्य विशेषांकाचे प्रकाशन

पुणे : कोरोना व्हायरसमुळे सर्व जग घरात बसले होते. परंतु आपल्या शेतकऱ्याकडे पाहा, त्याला असे कितीतरी व्हायरस माहिती आहेत. शेतामध्ये विविध पिके असतात. त्यावर सतत काही ना काही कीड, रोग पडत असतो. हे व्हायरसच असतात. त्यावर उपाय काय करायचे, हेदेखील शेतकऱ्याला माहीत असते. कोरोना व्हायरस असताना लॉकडाऊन केले. ते करण्याची गरज नव्हती, असे मत ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. तृणधान्य खा आणि व्हायरसपासून दूर राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

वनराईच्या वतीने मिलेट्स या विषयावर ‘लघु-तृणधान्य विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, माजी संपादिका साधना धारिया श्रॉफ, सचिव अमित वाडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, यशदाचे उपमहासंचालक  डॉ.  मल्लिनाथ कलशेट्टी, धन्यकुमार चोरडिया आदी उपस्थित होते.

डॉ. मुळीक म्हणाले, पूर्वी आपल्याकडे तृणधान्यच खाद्य होते. नंतर ब्रिटिश आले आणि त्यांनी मग इतर धान्य आपल्याकडे आणली. तेच आज आपण खात आहोत. त्यातून पोषक घटक तृणधान्याएवढे मिळत नाहीत. परिणामी, अनेक आजार होतात. पण, तृणधान्य खाल्ले तर आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढते.
आपल्याला आजार होत नाहीत. सर्वात अधिक प्रथिने या तृणधान्यात असतात.

ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन म्हणाले की, आपण म्हणतो साखर खात नाही पण ज्वारी, बाजरी खाल्ली तरी पोटात जाऊन त्याची साखरच होते. कारण प्रत्येक पेशीला शर्करा हवी असते. प्रत्येक क्षणाला साखरेची गरज असते. विनाकारण आपण साखरेला बदनाम केले आहे. पण, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नसते. ज्वारी, बाजरी, राळ, नाचणी आदींचा तृणधान्यात समावेश होतो. सकाळी ज्वारीची भाकरी खाल्ली तर रात्री बाजरीची खा, त्यामुळे सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतील.

रवींद्र धारिया म्हणाले, ग्रामीण- लघु-आदिवासी बंधू-भगिनींच्या आहारातील लघु-तृणधान्यांचे प्रमाण कमी न होता कसे वाढत जाईल याकरिताही योग्य ते प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्यासह सर्वच समाजघटकांना तृणधान्यांतील पोषणमूल्य आणि त्याचे आहारातील महत्त्व याबाबत सातत्याने जागृत केले जात आहे.

अमित वाडेकर म्हणाले, आजमितीस जगभरातील सुमारे ७५ टक्के अन्न हे फक्त १२ पिकांचे वाण आणि ५ प्राण्यांच्या जातींपासून उपलब्ध होते, तर जगातील केवळ ६ कंपन्यांकडे ६० ते ८० टक्के बियाणांचे, धान्य प्रक्रियेचे आणि धान्य वापराचे नियंत्रण आहे. एकूणच वैश्विक अन्नव्यवस्था अतिशय संवेदनशील आणि अशाश्वत बनली असून, भविष्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

Leave A Reply

Translate »